अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुतर्थीला सकाळी 09.15 वाजता मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व सौ. घार्गे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची विधिवत प्राणप्रतिष्ठा होईल. याचबरोबर 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी दिली.
बुधवार 27 ऑगस्ट रोजी पहाटे महापूजा, प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सकाळी 09 वाजता रुद्रवंश’ ढोल पथकाची मानवंदना दिली जाईल. 03 ते 05 सप्टेंबरपर्यंत चंद्रकांत सुखदेव दहिंडे परिवाराच्या वतीने श्री गणेशयाग होणार आहे. त्याचे पौरोहित्य नाशिक येथील मुकुंदशास्त्री मुळे गुरुजी करणार आहेत तसेच 03 सप्टेंबर रोजी सकाळी 09 वाजता महिलांचे आरोही ढोलपथक वादन कला सादर करणार आहे. 05 सप्टेंबर रोजी सकाळी 08.30 वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती होईल. 06 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन दिनी सकाळी 08.30 वा. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व सौ. आशिया यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येईल. या मिरवणुकीमध्ये सुरुवातीस सनई चौघडा, युगंधर व रुद्रनाद हे दोन ढोलपथक वादन करणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केली जातील.
यावेळी ॲड. अभय आगरकर म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त 10 दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भविकांच्या सोयीसुविधांसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही ॲड. आगरकर यांनी सांगितले. गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरिश्चंंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा. माणिक विधाते, संजय चाफे, नितीन पुंड आदींसह श्री विशाल गणेश सेवा मंडळ व भक्तगण परिश्रम घेत आहेत.