Today News: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आईच्या डोळ्यासमोरच या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. यात बिबट्याने मुलीवर झडप घालून उचलून नेले. त्यानंतर शोधाशोध केली असता ही चिमुरडी एका झुडपात आढळली. बिबट्याच्या या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली आहे. रक्षा अजय निकम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. घराच्या अंगणात आई आपल्या एका मुलाला जेवण भरवत असताना घराजवळ शिकारीच्या हेतूने दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकत शिकार केली. हा शिकारीचा थरार आईच्या डोळ्यासमोरच घडलाय.
बिबट्याने चिमुकल्या मुलीला शेतात फरफटत नेले आणि तिला ठार केले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध घेतला असता दोन तासांनी मुलीचा मृतदेह सापडला. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच नागरिकांनी संताप व्यक्त करत बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.