Maharashtra Crime News: सोलापूरमध्ये सोन्यासाठी वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनसाखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करण्यात आला. त्यानंतर सुरेश यांचा मृतदेह ऊसाच्या फडात पुरून टाकला. या प्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड यांच्यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे करताच ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१७ फेब्रुवारीला सुरेश शिंदे हे बार्शी येथून बाभूळगावकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र,घरी पोहोचले नव्हते. २० फेब्रुवारीला बाभूळगाव मधील शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या गट क्रमांक १६५ मध्ये ऊस लागवडीचे काम सुरू असताना उसाच्या सऱ्यांमध्ये मानवी पाय दिसून आला. बार्शी तालुका पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृतदेह पुरण्यात आला होता आणि दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते. तसेच गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बाभूळगाव आणि आगळगाव परिसरात तपास सुरू केला आणि आरोपीना अटक केली.