नगर शहरातील राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी/ कोतकरांच्या ‘मविआ’तील उमेदवारीत मोठा अडसर
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर शहराच्या राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याच्या दृष्टीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अशोक लांडे खून प्रकरणातील दोषी कोतकर कुटुंबीय यांना आणि केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणामुळे नगर शहराचा नावलौकिकास काळीमा फासणार्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप यांना महाविकास आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व विधानसभा उमेदवारी देण्यास नगर शहर महाविकास आघाडीने तीव्र विरोध केला आहे.
आघाडीचे नेते शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम,माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम अनिलभैय्या राठोड, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले असून त्या पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
नगर शहर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. निलेश लंके आदींना संयुक्त सह्यांचे हे निवेदन या पदाधिकार्यांनी पाठवले आहे.
… तर आम्ही सर्व पदाधिकारी पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार!
महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाने जगताप व कोतकर या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या कुटुंबीयांना महाविकास आघाडीत प्रवेश देऊ नये. विधानसभेची उमेदवारी देऊ नये. गलिच्छ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या संबंधितांना पक्ष प्रवेश दिला गेल्यास नगर शहर महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा त्याग करतील व नगर शहराच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने पुढील योग्य ती भूमिका घेतील.
– प्रा. शशिकांत गाडे सर,
जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा, नगर
कोतकरांमुळेच नगर शहरात गुन्हेगारी; किरण काळे
नगर शहर विधानसभा मतदारसंघाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एक काळ या शहराची तुलना कैरो, बगदादशी होत असे. याचा आजही नगरकरांना अभिमान आहे. मात्र दुर्दैवाने मागील अनेक वर्षांपासून सोयर्या धायर्यांच्या संगनमतातून नगर शहराच्या राजकारणाचं अत्यंत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालं आहे. ते होण्यासाठी अशोक लांडे खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आणि अनेक वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर सध्या तात्पुरत्या जामिनावर बाहेर असणार्या भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर, सचिन कोतकर हे कोतकर कुटुंबीय जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना मविआची उमेदवारी देण्यास आमचा विरोध आहे.
– किरण काळे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष
समाज विघातकांसाठी नो एंट्रीचे फलक लावावेत!
कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरचा बिहार करणार्या कोतकर व जगताप कुटुंबीयांपैकी कोणालाही महाविकास आघाडीत प्रवेश देऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारणातील अशा समाज विघातक तत्त्वांसाठी महाविकास आघाडीने नो एंट्रीचे फलक लावत दरवाजे कायमचे बंद ठेवावेत.
– संभाजी कदम,
शहर प्रमुख, शिवसेना उबाठा, नगर शहर
गुन्हेगारीचे शुद्धीकरण करताना गुन्हेगारांना पाठबळ नको!
ज्यांच्यामुळे नगर शहराच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले, रक्तपात झाला, नगरचा बिहार झाला, येथील तरुण मुलांची आयुष्य उद्वस्त झाली, एमआयडीसीतील शोषणामुळे बेरोजगारी बोकाळली, व्यापार उध्वस्त झाला, ताबेमारी, दहशतीमुळे व्यापारी, उद्योजक, नोकरदार यासह सर्व सामान्य नगरकर नागरिक मेटाकुटीला आला, शहर बकाल झालं, अशा कोतकर कुटुंबीयांना महाविकास आघाडीत प्रवेश दिला गेल्यास आणि त्यांना उमेदवारी दिली गेल्यास नगर शहराच्या राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाचे कधीही शुद्धीकरण होणार नाही. असे करणे म्हणजे नगर शहरातील नागरीकांची क्रूर थट्टा होईल. बौद्धिक दिवाळखोरी तसेच गुन्हेगारांना पाठबळ देण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये.
– विक्रम राठोड, राज्य सहसचिव, युवा सेना
नगरकरांच्या मनातील उमेदवार असेल!
राज्यातील महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते हे अत्यंत जबाबदार नेते आहेत. नगरकरांची भावना त्यांना माहिती आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात नगरकर आता ठामपणे उभे राहिले आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राज्य पातळीवर नेते निश्चितपणे उमेदवारी देताना योग्य तो विचार करतील आणि नगरकरांच्या मनातील उमेदवार येत्या निवडणुकीत असेल!
– दादाभाऊ कळमकर, माजी आमदार
स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार द्या!
स्वच्छ चारित्र्याच्या महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही योग्य उमेदवारास संधी देत नगरकरांना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणार्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यास संधी द्यावी.
– भगवान फुलसौंदर,
माजी महापौर तथा जिल्हा उपप्रमुख, शिवसेना उबाठा, नगर
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विरोधात नगरकर!
कोतकर कुटुंबातील महिला उमेदवारास महाविकास आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश देत नगर शहरातून विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, यातील कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्या विरोधात भूमिका घेणार! नगर शहरात गुन्हेगारी कोतकर यांच्यामुळेच वाढली. त्यांच्याच विरोधात आम्ही संघर्ष केला आहे. शहरातील नागरिकांची मानसिकताही कोतकर यांच्या विरोधात असल्याने त्याची नोंद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे.
– अभिषेक कळमकर, माजी महापौर, नगर
गुन्हेगारांना निवडण्याची अपरिहार्यता लादू नका!
गुन्हेगारांना महाविकास आघाडीत प्रवेश आणि विधानसभेची उमेदवारी दिल्यास नगरकरांवर गुन्हेगारांनाच निवडण्याची अपरिहार्यता लादली जाईल. याला नगरकरांचा तीव्र विरोध आहे. तसा आमचा शहर महाविकास आघाडीचा देखील विरोध आहे.
– बाळासाहेब बोराटे, माजी विरोधी पक्ष नेता, नगर मनपा