अहिल्यानगर । नगर सह्याद्री-
शहराच्या दिल्लीगेट परिसरात बुधवारी दि. १६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एका डंपरने पायी चालणार्या तरुणाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून डंपरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच -१६ सीसी ८२४४ क्रमांकाचा डंपर दिल्लीगेट परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याने पायी चालत असलेल्या एका तरुणाला चिरडले. अपघात झाल्याचे समजताच परिसरात काही क्षणांतच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अपघातानंतर चालक डंपरसह घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या अपघातामुळे शहरातील बेकायदेशीर डंपर वाहतुकीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.