सारिपाट / शिवाजी शिर्के
प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्याच्या राजकारणातील आपला वेगळा ठसा शेवटपर्यंत उमटवला. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा हा दूधवाला पहिलावान कायम चर्चेत राहिला तो त्यांच्या राजकीय डावपेचांनी! त्यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रसंग आले. त्यातून त्यांना तुरुंगवारीही झाली. मात्र, न डगमगता खंबीर भूमिका घेत त्यांनी त्या- त्या प्रसंगातून मार्ग काढला. कधीकाळी नगरमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष राहिलेल्या भानुदास कोतकर आणि अरुणकाका जगताप या दोघांशी नातेसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर या तिघांनी मिळून जिल्ह्याचे राजकारण बदलवले! मात्र, अलिकडे कोतकर आणि जगताप यांच्यात राजकीय कटुता निर्माण झाली. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शिवाजीरावांनी अनेकदा केला. मात्र, त्यात यश येत नसल्याची सल त्यांच्या मनात होती आणि ती शेवटपर्यंत तशीच राहिली. आता, त्यांच्या पश्चात जगताप आणि कोतकर या दिग्गज कुटुंबामध्ये श्रद्धा आणि सबुरी नांदावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दशक्रियाविधीच्या निमित्ताने या अपेक्षेला तोंड फोडण्याचे काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केले. कर्डिलेंसह जगताप- कोतकर कुटुंबाला मोठा राजकीय वारसा नव्हता आणि नाही. या तिघांनीही स्वत:च्या हिमतीवर तो निर्माण केला. या तिघांनीही आणि त्यातही विशेषत: कोतकर- जगताप यांनी एकत्र यावे असे जसे अनेकांना वाटते तसेच या दोघांचे मनोमिलन होऊ नये अशी मिठाचा खडा हातात घेऊन उभ्या ठाकलेल्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे विखे पाटलांसह साऱ्यांनीच व्यक्त केलेली श्रद्धा अन् सबुरीची भूमिका घ्यायची की मिठाचा खडा हातात घेऊन बसलेल्यांच्या नौटंकीत कुटुंब उद्धवस्त होरपळून घ्यायचे हे आता जगताप- कोतकर कुटुंबाने ठरविण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलेल्या शिवाजीरावांनी 2019 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता सहावेळा विधानसभा गाठली. विखे पाटील आणि थोरात यांच्यातील संघर्षात शिवाजीराव कधी थोरातांच्या बाजूने गेले तर कधी विखेंच्या बाजूने! मात्र, त्यांची भूमिका जिल्हा बँकेसह जिल्हा परिषदेमधील सत्तेची गणिते मांडताना निर्णायक ठरली. विखे आणि थोरात या दोन्ही दिग्गज नेत्यांना कर्डिले यांनी अनेकदा कोंडीत पकडले! जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेताना तिसरी शक्ती म्हणून शिवाजीराव कर्डिले यांची ओळख निर्माण झाली आणि ती कायम राहिली. जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदयराव शेळके यांचे अकाली निधन झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदी पवार समर्थक संचालकाची वर्णी निश्चित असताना शेवटच्या क्षणी शिवाजीरावांनी डाव टाकला आणि विखे पाटलांची साथ घेत बँकेेचे अध्यक्षपद स्वत:कडे खेचून आणले. नगर तालुक्यात एकहाती सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या दादापाटील शेळके यांच्या विरोधात बंडाची भूमिका घेतली त्यावेळी शिवाजीराव कर्डिले हे बुऱ्हाणनगरचे सरपंच होते. दूधाच्या किटल्या दुचाकीवर बांधून नगर शहरात दूध विक्री करणाऱ्या नगर तालुक्यातील साऱ्यांची मोट त्यांनी बांधली आणि यशवंतराव गडाख- दादापाटील शेळके यांनी उमेदवारी दिलेल्या विजया कुटे यांचा पराभव कर्डिलेंनी केला. तेव्हापासून 2019 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता शेवटच्या क्षणापर्यंत विधानसभेवर कायम प्रतिनिधीत्व केले.
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून ते त्यांचे तेराव्याचे विधीकार्य होण्याच्या दिवसापर्यंत बुऱ्हाणनगरचा रस्ता त्यांच्या चाहत्यांनी कायम वाहताना दिसला. अबालवृद्धांपासून ते महिला- माता भगिनी, तरुण अशा साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या राहिल्या. सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवाजीरावांनी कायम सामान्यांचेच प्रतिनिधीत्व केले. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत पायाला भिंगरी बांधल्यागत त्यांनी काम चालू ठेवले. नगर तालुका पंचायत समितीत उपसभापती, सभापती या पदांवर काम करत असताना भानुदास कोतकर यांच्याशी शिवाजीराव कर्डिले यांचा संघर्ष उडाला. त्यातून दोघांचेही समर्थक अनेक गावांमध्ये एकमेकांशी भिडले. संदीप आणि सुवर्णा यांच्या लग्नाच्या निमित्ताने या हे दोघे एकमेकांचे व्याही झाल्याची बातमी समोर आली त्यावेळी जिल्ह्यातील अनेकांना धक्का बसला. कारण, त्यावेळी या दोघांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. मात्र, ही सोयरीक झाली अन् व्याही- व्याही म्हणून दोघांची गळाभेट झाल्यानंतर या दोघांंच्यातील राजकीय वर्चस्वाचा संघर्ष संपला. पुढे कर्डिले- जगताप हे व्याही- व्याही झाले. त्याच दरम्यान जगताप- कोतकर हेही व्याही झाले.
कर्डिले- कोतकर हे दोघेही नगर तालुक्याच्या सक्रिय राजकारणात होते. त्याचवेळी अरुणकाका जगताप हे शहराच्या राजकारणात! नगरपालिका बरखास्त होऊन महापालिका अस्तित्वात आली आणि कोतकरांचा बालेकिल्ला समजला जाणारा केडगाव उपनगराचा भाग नगर शहरात जोडला गेला आणि कोतकरांची नगर शहराच्या राजकारणात एंट्री झाली. शहराच्या राजकारणात येताच संदीप कोतकर यांना महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, असे असतानाही भानुदास कोतकर यांनी नगर तालुक्याच्या राजकारणाशी, कार्यकर्त्यांशी असणारी नाळ आजपर्यंत तुटून दिली नाही.
कोतकर परिवार नगर शहराच्या राजकारणात फुलफॉर्म मध्ये असताना अरुणकाका जगताप हे तटस्थपणे हे सारे पाहत होते. पुढे लांडे प्रकरणात कोतकर परिवाराला तुरुंगात जावे लागले आणि नगरच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली. त्याचवेळी शिवाजीराव कर्डिले यांचे दुसरे जावई संग्राम अरुणकाका जगताप यांची राजकीय एंट्री झाली. दोनदा महापौर म्हणून त्यांना काम करता आले. आणि सलग तिनदा त्यांनी आमदार म्हणून नगर शहराचे प्रतिनिधीत्व केले. हे करत असताना राज्यातील नेत्यांशी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यातून नगर शहराच्या वैभवात भर घालणारी अनेक विकास कामेही त्यांनी माग लावली.
जगताप परिवाराच्या भोवती राजकीय वलय निर्माण होत असताना गत विधानसभा निवडणुकीवेळी कोतकर कुटुंबातील सदस्याचे नाव उमेदवारीसाठी समोर आले. मात्र, कोतकर परिवाराने त्यातून माघार घेतली. त्याआधीही असेेच झाले. आता महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले. कोतकर परिवार त्यांचे राजकीय वर्चस्व आणि राजकीय उपद्रवमुल्य दाखवणार यात शंकाच नाही. यापार्श्वभूमीवर कोतकर- जगताप यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. हा संघर्ष उभा राहू नये, दोघांनीही सबुरीने एकत्र यावे अशी अनेकांची भावना आहे. मात्र, काहींना हे नको आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही तिनही कुटुंबे भाजून निघाली आहेत. आता आणखी भाजायचे नसेल तर श्रद्धा आणि सबुरी घेण्यातच कोतकर- जगताप कुटुंबाचे हित आहे. तसे झाले तर अक्षय कर्डिले यांचा विधानसभेतील आमदारकीचा मार्ग अधिक प्रशस्त होईल आणि तीच कोतकर- जगताप या दोन्ही व्याह्यांची शिवाजीराव कर्डिंले यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
जिल्हा बँकेत अक्षय कर्डिलेंना संधी मिळणार का?
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मीक निधन झाले. नगर तालुक्यातून संचालक म्हणून अनेक वर्षे बँकेत राहिले. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना संधी देण्याची गरज आहे. तालुक्यातील जनतेसह जिल्ह्यातील अनेकांनी तशा भावनाही व्यक्त केल्या आहेत. संचालक मंडळाची बैठक लवकरच होईल आणि बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदा बाबत सहकार प्राधिकरणाला कळवले जाईल. त्यानंतर प्राधिकरणकडून नवीन अध्यक्ष निवडीबाबत कार्यक्रम बँकेला कळवला जाईल व त्यानुसार अध्यक्षपदाची निवड होईल. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असल्याने नव्या अध्यक्षांना तीन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.



