विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या परिक्षेचा शनिवारी (23 नोव्हेंबर) निकाल असल्याने उमेदवरांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. मात्र विधानभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यापूवच उमेदवारांच्या समर्थकांनी मात्र फ्लेक्स, गुलाल अन मिरवणुकीची जंग्गी तयारी केली आहे. मतदारसंघातील निकालाबाबत चौकाचौकात दावे प्रतिदावे केले जात आहेत. लाखोंच्या पैजाही लागल्या आहेत. तसेच सट्टा बाजारानेही भाव खाल्ला असल्याने विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. 20 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवारी दि.23 जिल्ह्यातील 12 मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. साधारण एका मतदारसंघासाठी 100 ते 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना (शुक्रवारी) मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्राच्या संख्येनूसार मतदानाच्या फेऱ्या ठरणार असून प्रत्येक ठिकाणी मोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकावेळी 14 टेबलची मोजणी पूर्ण झाल्यावर मोजणीचा एक राऊंड होणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीच्या फेऱ्या या शेवगाव आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 26 अशा होणार आहेत. तर श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड प्रत्येकी 25 फेऱ्या होणार असून राहुरी, श्रीरामपूर आणि अकोले मतदारसंघात प्रत्येकी 22 फेऱ्या होणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीसाठी वेळ या चार मतदारसंघांत लागणार आहे. उर्वरितमध्ये नगर शहरात 21 फेऱ्या, संगमनेर 21 फेऱ्या, नेवासा 20 फेऱ्या तर शिड आणि कोपरगाव मतदारसंघात प्रत्येकी 19 फेऱ्या होणार आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रात मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 डेबल लावण्यात येणार आहेत. यासह सैनिक व पोस्टल मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. प्रत्येक ठिकाणच्या मतमोजणीसाठी 100 ते 150 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना आज मोजणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार असून साधारणपणे दहाव्या फेरीपासून निकालाचा प्राथमिक कल हाती येणार आहे.