अहमदनगर | नगर सह्याद्री
लघुशंकेसाठी थांबलेल्या दोन मित्रांना नऊ जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत लुटले. त्यांच्याकडील सोन्या – चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल असा दोन लाख ३१ हजाराचा ऐवज काढून घेतला आहे. नगर – सोलापूर महामार्गावरील वाटेफळ (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.
या प्रकरणी निखिल संजय अच्छा (वय ३४ रा. शिक्षक कॉलनी, रामलिंग रस्ता, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी नऊ जणांविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल हे गोळ्या बिस्कीटाचे होलसेलर आहेत. ते त्यांचा मित्र अरूण मधुकर कानडे (पत्ता नाही) यांच्यासह वाहनातून नगर – सोलापूर रस्त्याने जात असताना वाटेफळ शिवारात दुपारी चारच्या सुमारास लघुशंकेसाठी थांबले. त्याच दरम्यान तेथे अनोळखी नऊ जण आले.
त्यांनी निखिल व त्यांचा मित्र अरूण यांना मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील दोन मोबाईल, एक खड्याची अंगठी, १५ ग्रॅमची सोन्याची चेन, एक ग्रॅमची सोन्याची बाळी, ४९ ग्रॅमचे चांदीचे कडे, एक बंदूक व तीन काडतुसे, ९८ हजाराची रोकड असा एकुण दोन लाख ३१ हजाराचा ऐवज काढून घेतला व पसार झाले. या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, त्यानंतर निखिल व अरूण यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक रणजित मारग यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.