२० लाख रुपयांचा पाडळी-कान्हुर रस्त्याचे भूमिपूजन
पारनेर । नगर सहयाद्री:-
रस्ते फक्त प्रवासाचे साधन नसून गावांना, शहरांना आणि नागरिकांना जोडणाऱ्या जीवनवाहिन्या आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा माल वेळेवर बाजारपेठेत पोहोचतो, ग्रामीण उद्योगांना गती मिळते, रोजगारनिर्मिती वाढते आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे महत्त्व अनमोल असल्याचे मत आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हुर येथे भाळवणी ते काळकुप ते पाडळी गोरेगाव या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते पार पडले. या कामासाठी शासनाकडून २० लाख रुपयांचा निधी प्रशासकीय मंजुरीसाठी उपलब्ध झाला आहे. याप्रसंगी आमदार दाते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार दाते म्हणाले,आज संपूर्ण मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते आपल्या विकासाचा पाया आहेत. जसे रक्तवाहिन्यांशिवाय शरीर कार्य करू शकत नाही, तसे रस्त्यांशिवाय देशाचा विकास शक्य नाही.
मतदारसंघातील प्रत्येक गावात पक्के आणि दर्जेदार रस्ते तयार करणे माझे प्राधान्य आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य, व्यापार आणि रोजगार यांसारख्या क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रगतीच्या संधी मिळतील. आज पाडळी तर्फे कान्हुर येथे तयार होणारा रस्ता सक्षम समाज आणि प्रगत राष्ट्राकडे नेणारा मार्ग ठरेल.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष हरीष काका दावभट, तसेच सर्जेराव दावभट, राजू दावभट, प्रथमेश सुंबे, अंकुश सुंबे, अमन दावभट, डॉ. मिनिल सुंबे, राहुल काळे, रघुनाथ दावभट, संदीप वलगुडे, डॉ. विष्णु काळे, अक्षय शिरसाठ, संजय दावभट, बबन दावभट, गवराम सुंबे, सावळेराव काळे, माऊली सुंबे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



