मुंबई । नगर सहयाद्री:-
भिवंडी वाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर उभारण्यात येत आहे. तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या या मंदिराचे काम पूर्ण झाले असून, 17 मार्च रोजी तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला मंदिराचे लोकार्पण होणार आहे.
अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडवणारे अरुण योगी यांच्या हस्ते सहा फूट अखंड कृष्णशिला पाषाणातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवण्यात आली आहे. तब्बल एक एकर जागेवर 56 फूट उंचीचे हे मंदिर बांधण्यात आले आहे. पुढील 400 वर्षे टिकेल अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. भाजपा (BJP) आमदार संजय केळकर यांनी या मंदिराला भेट दिली आणि मंदिर परिसरातील कामाची माहिती घेतली.
त्यांनी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजुभाऊ चौधरी यांच्या मंदिर उभारणीच्या कार्याचे कौतुक केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. शिवजयंतीला लोकार्पण झाल्यानंतर सामान्य नागरिकांना या मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे. मंदिराची रचना, सुबक नक्षीकाम आणि हिरवळ लक्ष वेधून घेणारी आहे.