Maharashtra News: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर उफाळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे ते फोटो आहेत. राजीनामा देऊन मुंडे सुटणार नाहीत ,अशी परखड प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातयांनी देखील या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सरकारवर ताशेरे ओढले. माजी मंत्री थोरात म्हणाले, “स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे ते फोटो आहेत. हे सर्व पुरावे 80 दिवसांपासून सरकारकडे होते, पण सरकारने काहीच केले नाही.
सरकारने निर्लज्जतेचा कळस गाठला आहे. एखाद्या राजीनाम्याने हा विषय संपणार नाही, आम्ही न्यायासाठी लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली. राजकीय वर्तुळात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही संतोष देशमुख हत्या प्रकरण संपलेले नाही. अनेक नेत्यांनी सरकारला जाब विचारत या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.