अहिल्यानगर | नगर सह्याद्री:
भिंगार हद्दीत कॅन्टोन्मेंट लॉन परिसरात शुक्रवारी (7 फेब्रुवारी) रात्री 11.45 वाजता दोन अनोळखी इसमांनी दारूच्या नशेत गोंधळ घालत नागरिकांना शिवीगाळ केले. दोघांवर चाकू व दगडाने हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन अनोळखीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
फरदिन खलील शेख (वय 21) यांनी फिर्याद दिली आहे. ते साक्षीदार बंटी गोहेर (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांच्यासोबत कॅन्टोन्मेंट लॉन परिसरात असताना, दारू पिलेल्या दोन अनोळखी इसमांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना तंबाखू चघळण्यास दिली, मात्र काही वेळाने त्यातील एकाने अचानक फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यामुळे त्यांच्या गळ्यातून रक्तस्राव सुरू झाला. त्याचवेळी दोन्ही संशयित आरोपींनी लांबून दगड फेकले, ज्यामुळे साक्षीदार बंटी गोहेर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.
जखमी फिर्यादीला प्रथम भिंगार मधील खासगी हॉस्पिटलयेथे दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. जबाबावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही. आर. गारूडकर करत आहेत.
भिंगारमध्ये विद्यार्थ्याला पती-पत्नीची मारहाण
भिंगार हद्दीतील मळगंगा माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्गातच पती- पत्नीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र भानुदास बेरड, दिपमाला मच्छिंद्र बेरड (दोघे रा. दरेवाडी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. फिर्यादी दरेवाडी शिवारात राहत असून त्यांचा मुलगा मळगंगा माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेतो. शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांचा मुलगा वर्गात उपस्थित असताना मच्छिंद्र बेरड व त्याची पत्नी दीपमाला यांनी जबरदस्तीने वर्गाचा दरवाजा बंद करून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. मच्छिंद्रने त्याच्या पाठीवर, मानेवर व पायावर वार केले, तर दीपमालाने शरीराच्या गुप्त भागावर हल्ला केला. ही घटना घडल्यानंतर विद्यार्थ्याने घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्याला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलीस अंमलदार एन. एस. पठारे अधिक तपास करत आहेत.