शिरुर। नगर सहयाद्री-
पुणे कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या गटनेन एका गावात खळबळ उडवून दिली आहे. एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दोन तरुणांना जीपखाली चिरडलं आहे. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: शिरुर तालुक्यातील अरणगावचे पोलीस पाटील मालवाहू पिकअप घेऊन शेतात निघाले होते. तेव्हा त्यांनी अल्पवयीन मुलीला पिकअप चालवण्यासाठी दिला. अरणगाव शेत शिवारात पिकअप आला असता, अल्पवयीन मुलीचे पिकअपवरील नियंत्रण सुटले.
त्याचवेळी पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की पिकअपने दोन्ही दुचाकीस्वारांना ४० ते ५० फूट लांब फरफटत नेलं. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.