Maharashtra Crime News: संशयाचे भूत डोक्यात शिरल्यानंतर जीवनाची राख रांगोळी ठरलेलीच आहे. अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चरित्राच्या संशयावरून तरुणाने गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केली. नागपूरच्या दाभा परिसरात ही घटना घडली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असुन अवघ्या काही तासांत अक्षय दाते याला अटक करण्यात आली आहे. हेमलता वैद्य (३० वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
हेमलता या पतीच्या मृत्यूनंतर नागपूरमध्ये मुलीसोबत राहत होत्या. हेमलता यांचे अक्षय दाते या तरुणासोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आहेत. पण अक्षय हेमलतावर नेहमी संशय घ्यायच्या. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. नेहमीप्रमाणे अक्षय आणि हेमलता यांच्यामध्ये याच कारणावरून भांडण झाले.
हेमलता बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये बसल्या होत्या. त्याचवेळी अक्षय त्याठिकाणी आला. त्यानेसोबत लोखंडी रॉड आणला होता. बसल्याठिकाणीच अक्षयने हेमलताला रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षयने हेमलताच्या डोक्यावर रॉड मारला त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.सोसायटीतील लोकांनी जखमी हेमलता यांना मेयो रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान हेमलता यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आईच्या मृत्यूमुळे पोरगी पोरकी झाली. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी अक्षयला तत्काळ अटक केली आहे.