भाजपला सर्वाधिक जागा; संख्याबळावर वाटप होणार
मुंबई । नगर सहयाद्री
राज्यातील महायुती सरकारमधील महत्त्वाच्या महामंडळांवर नेमणुकीसंदर्भात मोठा निर्णय झाला असून, अखेर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संख्याबळाच्या आधारावर हे वाटप होत असून, यामध्ये भाजपला सर्वाधिक ४४ महामंडळे, शिंदे गटाला ३३, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २३ महामंडळे मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, सिडको आणि म्हाडाया दोन अत्यंत महत्त्वाच्या महामंडळांवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी या महामंडळांवर हक्क सांगितला असून, यासंबंधी अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. महामंडळ वाटपाच्या निमित्ताने महायुती आघाडीच्या अंतर्गत नाराजी दूर करून आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मजबूत एकजूट साधण्याचा प्रयत्न करत आहे.
अनेक आमदार आणि वरिष्ठ नेत्यांना संतोषजनक वाटप करून पक्षांतर्गत समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महामंडळ प्रमुखपदांसोबतच त्यांना मिळणारे वित्तीय अधिकार, योजनांवरील नियंत्रण, आणि नियुक्ती प्रक्रियेतील भूमिका या मुद्द्यांवर देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे वाटप केवळ सन्मानाचे नसून राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यापुढे या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी कशी होते, आणि नाराजगटांची समजूत कशी काढली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.