spot_img
ब्रेकिंगAhmednagar politics : शिवाजी कर्डिलेंचा ताफा श्रीगोंद्यात डेरेदाखल! कोण कोण उतरणार रिंगणात...;...

Ahmednagar politics : शिवाजी कर्डिलेंचा ताफा श्रीगोंद्यात डेरेदाखल! कोण कोण उतरणार रिंगणात…; कसे राहील गणित…

spot_img

मांडवगण गटासह दत्ता पानसरे आणि वाळकी, चिचोंडीपाटील गट निर्णायक भूमिकेत | राजकीय हालचाली जोरात
अनुराधा नागवडे, विक्रम- साजन पाचपुतेही राहणार मैदानात | राहुल जगताप- घनश्याम शेलार यांचा सवाता सुभा
सारिपाट / शिवाजी शिर्के
Ahmednagar politics : लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य आणि त्या-त्या राजकीय पक्षांना मिळणार्‍या मतांचे गणित विधानसभेला कधीच लागू न पडलेला जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ म्हणजे श्रीगोंदा! गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत नागवडे- पाचपुते या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधात प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी भूमिका घेतल्याचे आणि त्यातूनच अवघ्या पंधरा दिवसात घनश्याम शेलार यांच्यासारख्या सामान्य उमेदवारांना मागील निवडणुकीत पाचपुतेंना घाम फोडल्याचा अनुभव सार्‍यांनीच घेतला. आता येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून विक्रम पाचपुते किंवा प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी मानली जाते. याशिवाय अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे, शिवसेना ठाकरे गटाकडून साजन पाचपुते, शरद पवार गटाकडून राहुल जगताप, काँग्रेसकडून घनश्याम शेलार असे पाच उमेदवार निश्चित मानले जात असताना श्रीगोंद्याच्या मोहीमेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी तयारी सुरू केली आहे. कर्डिले यांनी त्यांचा मोर्चा राहुरीकडून श्रीगोंद्याकडे वळविला असून त्यांच्या समर्थकांचा ताफा श्रीगोंद्यातील गावागावांमध्ये दाखल झाल्याने या मतदारसंघातील समिकरणे फक्त बदलणारच नाही तर कर्डिले येथे बाजी मारणार असल्याची परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघातून कोणत्या तालुक्यातून कोणाला मताधिक्य मिळाले आणि त्यातूनच विधानसभेचा उमेदवार कोण याची चर्चा झडत असताना सर्वाधिक वेगवान हालचाली श्रीगोंदा तालुक्यात सुरू झाल्या आहेत. त्याचे कारण ठरले आहेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची भूमिका! राहुरी हा खरे तर शिवाजी कर्डिले यांचा पारंपारीत मतदारसंघ! मात्र, मागील वेळी या मतदारसंघातून त्यांना प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यानंतरही त्यांनी या मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून विखेंना मताधिक्य मिळाले असले तरी ते निर्णायक नाही.

डावपेच ओळखण्यात आणि मारण्यात पटाईत असणार्‍या कर्डिले यांच्याकडून सेफ मतदारसंघ म्हणून गेल्या पंधरा- वीस दिवसात श्रीगोंद्यात चाचपणी झाल्याचे आणि त्यांनी येथून लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात कोण?
राहुरी विधानसभा मतदारसंघावर गेल्या साडे-चार वर्षात भक्कम पकड मिळविलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात कर्डिलेच उमेदवार असतील असे मानले जात होते. मात्र, प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहणार असल्याने त्याचा विचार करता महाविकास आघाडीकडून तनपुरे हेच उमेदवार असणार आहेत. महायुतीकडे ही जागा भाजपाची आहे. कर्डिले यांनी श्रीगोंद्यातून लढण्याचा निर्णय घेतला तर मग भाजपाला राहुरीत उमेदवार शोधावा लागणार आहे. अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजपाकडून तातडीने निर्णय झाला नाही आणि शेवटच्या क्षणी उमेदवार देण्याची वेळ आली तर तनपुरे यांच्या बाजूने ही निवडणूक जाणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.

… तर वाळकी जिल्हा परिषद गटातून अक्षय कर्डिले असणार उमेदवार!
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका विधानसभे आधी होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक कधीही झाली तरी वाळकी जिल्हा परिषद गटातून अक्षय कर्डिले हेच उमेदवार असणार आहेत. अक्षय कर्डिले यांनी या गटातील संपर्क गेल्या वर्षभरापासून वाढवला आहे. त्यांचेच नाव विधानसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत असले तरी बदलती राजकीय समिकरणे ओळखून स्वत: शिवाजी कर्डिले यांनी श्रीगोंद्यातील विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय गणिते बदलणार आहेत आणि अक्षय कर्डिले हे वाळकीतील जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असणार हे नक्की!

गुरु- शिष्याच्या भूमिकेतील राहुल जगताप यांच्यासमोर धर्मसंकट!
जिल्हा बँकेच्या माध्यमातून कुकडी साखर कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेत या कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्यास मोलाची भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणार्‍या शिवाजी कर्डिले यांनी घेतली. याशिवाय, त्याआधीपासूनच राहुल जगताप हे कर्डिले यांना राजकीय गुरु मानत आले आहेत. राहुल जगताप आणि शिवाजी कर्डिले यांच्यातील गुरु- शिष्याची जोडी सर्वश्रूत आहे. शिवाजी कर्डिले यांनी लढण्याचा निर्णय घेतल्यास जगताप यांच्यासमोर मोठे धर्मसंकट येऊ शकते.

आ. बबनराव पाचपुते यांच्याऐवजी पत्नी की मुलगा?
भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याने फारसे सक्रिय नाहीत. विक्रम पाचपुते हे बर्‍यापैकी त्यांचे कामकाज पाहतात आणि विविध कार्यक्रम, बैठकांना हजेरी लावतात. याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असणार्‍या प्रतिभा पाचपुते यांचेही महिलांचे मोठे संघटन आहे. येणार्‍या निवडणुकीत भाजपाकडून आपल्याच कुटुंबात मुलगा विक्रम अथवा पत्नी प्रतिभा यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळावी यासाठी आतापासूनच पाचपुते यांनी हालचाली चालू केल्या असल्याचे समजते.

सापत्न वागणुकीने जागा झाला नगर तालुक्याचा स्वाभिमान; होऊ शकतात तीन आमदार!
नगर मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर हा मतदारसंघ श्रीगोंदा, पारनेर आणि राहुरी अशा तीन मतदारसंघात प्रत्येकी दोन जिल्हा गटानुसार जोडला गेला. तीन आमदार असूनही कोणत्याच आमदाराकडून नगर तालुक्याला न्याय मिळाला नसल्याची भावना गेल्या चार- पाच वर्षात नगर तालुक्यातील बहुतांश गावात वाढीस लागली आहे. सापत्नपणाच्या या वागणुकीनेच नगर तालुक्यातील गावागावातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत नगर तालुक्याने याच सापत्न वागणुकीच्या रोषातून एकसंघ निर्णय घेतल्यास या तालुक्यातून तीन आमदार होऊ शकतात. नगर तालुुक्यातील जनतेने त्या- त्या तीनही मतदारसंघातून ७०- ७५ टक्के नगर तालुक्यातील उमेदवाराच्या पदरात टाकली तर श्रीगोंदा, पारनेर आणि राहुरीचे समिकरणच बदलले जाऊ शकते! कारण या तीनही तालुक्यांमधून किमान तीन उमेदवार असणार आहेत. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असणारी ७०- ७५ हजार मते नगर तालुक्यातून मिळाली तरी नगर तालुक्याचेच तीन आमदार विधानसभेत जाऊ शकतात!

अजित पवार यांच्याकडून अनुराधा नागवडेंना शब्द!
जिल्हा परिषदेमध्ये महिला- बालकल्याण समितीच्या सभापती राहिलेल्या स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा आणि नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या सौभाग्यवती अनुराधा नागवडे या विधानसभेच्या तयारीत आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात दाखल होतान राजेंद्र नागवडे- अनुराधा नागवडे यांना विधानसभेचा शब्द अजित पवार यांच्याकडून मिळाला आहे. याशिवाय सोबतीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळणारे बाळासाहेब नाहाटा हे देखील आहेतच. कारखान्याची यंत्रणा आणि तालुक्यातील जनसंपर्क, महिलांचे संघटन ही नागवडे यांची जमेची बाजू आहे.

वाळकी, चिचोंडी पाटील गट कर्डिलेंना सोयीस्कर!
स्थानिक उमेदवार म्हणून मिळू शकणारी सहानुभूती, नगर तालुक्यावर याआधी झालेला श्रीगोंद्यातील आमदारांकडून अन्याय आणि त्यांचा नगर तालुक्यातील गावांशी राहिलेला कमी संपर्क, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्डिले यांचा संपर्क आणि या भागाचे आमदार नसतानाही त्यांनी बहुतांश कुुटंबांशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्यातूनच वाळकी आणि चिचोंडी पाटील या दोन्ही जिल्हा परिषद गटांमधील गावांमध्ये आजही शिवाजी कर्डिले- अक्षय कर्डिले या पिता-पुत्रांचा संपर्क कायम आहे.

शिवाजी कर्डिले अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता अधिक!
श्रीगोंदा मतदारसंघात भाजपाचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. प्रकृती आणि आजारपण यामुळे त्यांच्याऐवजी कुटुंबातील अन्य सदस्यांच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशिल आहेत. पाचपुते यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्ष पातळीवर झाला तर शिवाजी कर्डिले हे बंडखोरी करण्याची आणि अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता जास्त आहे. अपक्ष उमेदवारी करून निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपाला पाठींबा देण्याची भूमिका त्यांनी घेतल्यास आश्चर्य वाटू नये. याशिवाय विधानसभेत कोणालाही बहुमत न मिळाल्यास अपक्ष आमदाराला येणारी किंमत कशी असते याचा अनुभव कर्डिले यांच्याकडे आहेच! त्यामुळेच अपक्ष उमेदवारी हाच पर्याय ते निवडतील आणि नगर तालुक्यात स्वाभिमानाची साद घातली जाईल.

राहुल जगताप यांची तुतारी अन् घनश्याम शेलारांचा पंजा!
माजी आमदार राहिलेल्या राहुल जगताप यांचे कुकुडी कारखान्याच्या माध्यमातून मोठे संघटन आहे. याशिवाय तालुक्यातील तरुणाईचा मोठा पाठींबा त्यांना आहे. शांत, संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे तालुक्यातील जनता पाहते. कारखाना अडचणीत असल्याने मागील वेळी त्यांनी विधानसभेत थांबण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. शरद पवार यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद असल्याने ते पवार गटाचे उमेदवार हे नक्की! याशिवाय मागील निवडणूक निसटता पराभव पदरी पडलेल्या घनश्याम शेलार यांनीही पुन्हा कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेचा शब्द बाळासाहेब थोरात यांच्याकडून मिळवला असल्याचेही त्यांचे समर्थक सांगत आहेत.

साजन पाचपुते तरुणाईच्या गळ्यातील ताईत!
बबनराव पाचपुते यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते अगदी कालच्या विधानसभा निवडणुकीपर्यत प्रचाराची संपूर्ण धुरा आणि यंत्रणा सांभाळण्याचे काम सदाअण्णा पाचपुते यांनी केले. बबनराव पाचपुते यांच्यावर कोणाची कसलीही नाराजी असली तरी सदाअण्णा त्यांना भेटल्यानंतर ती नाराजी दूर होणार असेच काहीसे गणित राहिले. मात्र, मध्यंतरी आजारपणात अण्णांचे निधन झाले. यानंतर कुटुंबात फूट पडली. यानंतर श्रीगोंदा नगरपालिका आणि काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत साजन यांनी बबनराव पाचपुते यांच्या विरोधात दंड थोपटले आणि आपला करिष्मा सिद्ध केला. तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे.

बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार, टीळक भोस निर्णायक ठरणार!
श्रीगोंदा तालुक्यातील संभाव्य उमेदवारांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे या तिघांसह अण्णासाहेब शेलार यांची नावे विधानसभेसाठी चर्चेत असली तरी अण्णासाहेब शेलार या मैदानात उडी मारु शकतात. बाबासाहेब भोस हे निर्णायक भूमिका घेतील. उमेदवारी करण्याची शक्यता कमीच आहे. बाळासाहेब नाहाटा आणि दत्तात्रय पानसरे हे दोघे परिस्थिती पाहून निर्णय घेत आले आहेत. याशिवाय दोघांच्याही भूमिका या किंग होण्यापेक्षा किंगमेकर होण्यातच जास्त निर्णायक ठरत आल्या असल्याचे याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत समोर आले आहे. यावेळीही परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत आहे. युवा नेतृत्व म्हणून टिळक भोस यांच्याकडे पाहिले जाते. बीआरएस पक्षासोबत गेल्यानंतर ते आता लोकसभेपासून तालुक्यातील अपप्रवृत्ती आणि प्रस्थापितांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांचीही भूमिका निर्णायक असणार आहेच!

श्रीगोंद्यातील मांडवगण गट आणि जावई दत्तादाजींची साथ थेट भेटल्यास कर्डिलेच आमदार!
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गटात माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे पुत्र युवा नेते सचिन जगताप हे अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांची भक्कम पकड या गटावर राहिली आहे. त्यामुळेच या गटावर त्यांनी सलग विजय मिळवले आहेत. नगर तालुक्याला लागून असणारी या गटाची गावे आणि त्यांचा संपर्क श्रीगोंदा तालुक्यात फक्त प्रशासकीय कामांसाठीचाच! बाकी त्यांचे अन्य व्यवहार आणि राबता हा नगर शहर आणि नगर तालुक्याशीच! त्यामुळे हा गट कर्डिले यांना पोषक असल्याचे मानले जाते. याशिवाय जगताप परिवाराचे जावई दत्तात्रय पानसरे यांचा संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात मोठा संपर्क आणि राबता आहे. जगताप परिवाराशी कर्डिले हे जोडले गेले आहेतच. त्यामुळेच जगतापांचे जावई असणार्‍या दत्तादाजी यांनी कर्डिले यांच्यासाठी निर्णायक भूमिका घेतल्यास ती जमेची बाजू ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...