मुंबई / नगर सह्याद्री
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचा स्फोट घडवला. तर आज शिंदे सेनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. निडणूक आयोगाने अजून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. पण शिंदे सेनेच्या या बड्या नेत्याने थेट महापौरच जाहीर केला आहे. तर त्यांनी भाजपकडे एकदम कानाडोळा केला असे नाही, तर एक ऑफर पुढे ठेवली आहे.
जालना महापालिकेच्या महापौर पदावरून आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकले आहेत. विष्णू पाचफुले शिवसेनेचा पाहिला महापौर होतील असे अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले. त्यांनी पाचफुले हे महापौर पदाचे उमेदवार असतील हे जाहीर केले. आम्ही दोन पावलं पुढे टाकलेले आहे आणि अजूनही दोन टाकू त्यामुळे भाजपने या बाबीचा विचार करावा,नाही केला तर आम्ही ताकतीने लढणार असल्याचा खोतकर यांनी थेट इशारा दिला.
तर भाजपला हा अर्धी टर्म उमेदवारी
जालना महानगरपालिकेच्या महापौर पदावरून आमदार अर्जुन खोतकर यांनी पुन्हा एकदा पहिला महापौर शिवसेनेचा आणि तोही विष्णू पाचफुलेच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आम्ही आमचा महापौर पदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव आल्यावर आम्ही विचार करू असं देखील खोतकर यांनी म्हटलं. भाजपच्या स्नेहमिलन मेळाव्यात मी गेलो आणि त्या दिवशी बोललो भाजप जर अर्धी टर्म मागत असेल तर आम्ही देऊ शकतो, परंतु पहिली टर्म ही शिवसेनेची आणि दुसरी भाजपची असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी युतीमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचाच महापौर होईल असा दावा केला. आम्ही दोन पावलं पुढे टाकलेले आहे आणि अजून दोन टाकु,परंतु भाजपने या बाबीचा विचार करावा,नाही केला तरीही आम्ही आमच्या ताकदीने लढू असा इशारा देखील अर्जुन खोतकर यांनी दिलाय.
आता कामाला लागा
शिवसेनेच्या दीपावली स्नेह मिलन पाडव्यातून आमदार अर्जुन खोतकर यांचं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केले. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जालन्यात महायुतीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका जरी सुरू असल्या आणि युती करण्याच्या संदर्भात सकारात्मकता दिसत असली तरी मात्र दुसरीकडे हे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना ताकतीने लढण्याचं आवाहन करत आहे.बदनापुरात शिवसेनेच्या वतीने आयोजित दीपावली स्नेह मिलन पाडव्यात आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील कार्यकर्त्यांना ताकतीने लढण्याच आवाहन केलंय.युती होईल अशी अपेक्षा करूया नाही झाली तर आपण आपल्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही असं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं,आम्हाला शिवसेना आणि युती म्हणून लढायचं आहे,त्यासाठी आम्ही दोन पावलं पुढे टाकली आहेत परंतु शेवटी हे काय बोलतात हे मला माहीत नाही असा देखील टोला अर्जुन खोतकर यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांना लगावला.



