Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर केला आहे. आयएमडी प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित असून, ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा जून ते सप्टेंबर या काळात देशभरात सरासरीच्या १०३% ते १०५% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे आगमन यंदा वेळेआधीच होऊ शकते, असेही संकेत आहेत. साधारणपणे १५ जूनपर्यंत मान्सून देशभरात पोहोचतो, पण यंदा तो लवकर दाखल होऊ शकतो. मात्र, हा पाऊस देशभरात समान असेलच असे नाही. काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यात केरळ , आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या प्रदेशांचा समावेश आहे
.महाराष्ट्रासाठी मात्र यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा , छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही चांगला पाऊस अपेक्षित आहे. महिनानिहाय विचार केल्यास, जूनमध्ये सरासरीच्या ९६% कोकण गोव्यात अधिक, जुलैमध्ये १०२%, ऑगस्टमध्ये १०८% आणि सप्टेंबरमध्ये १०४% पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीला किंचित कमी पाऊस असला तरी, नंतरच्या महिन्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.