शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
भ्रष्टाचार, आर्थिक देवाण घेवाण, शिक्षकांना मानसिक त्रास आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे गंभीर आरोप समोर आले आहेत. अहिल्यानगर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाबाबत शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अनेक शिक्षकांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिक्षकांच्या तक्रारीबाबत वरिष्ठ अधिकार्यांचे मौन चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सध्या सुरू असलेल्या कारभाराबाबत शिक्षकांच्या अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. गटशिक्षण कार्यालयातील काही कामांसाठी शिक्षकांकडून आर्थिक मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्व्हिस बुक ऑनलाईन भरण्याचे काम कार्यालयीन कर्मचार्यांचे असूनही ते शिक्षकांकडून करून घेतले जाते आणि त्यासाठी शाळेबाहेर जावे लागते, अशी तक्रार शिक्षकांकडून करण्यात आली आहे.
काही तक्रारी केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी यांनी लेखी दिल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. आर्थिक देवाण घेवाणच्या माध्यमातून प्रकरणे मिटवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कार्यालयात अनेक वेळा गटशिक्षणाधिकारी उपस्थित नसतात, कामाचा निपटारा वेळेत होत नाही, तर दुसरीकडे शिक्षकांना शाळेबाहेरील कामात गुंतवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाते. याशिवाय, काही महिला शिक्षकांनीही आपल्या नाराजीचा सूर व्यक्त केला असून, गटशिक्षण कार्यालयात शिक्षक संघटनांनाही जुमानले जात नाही. निर्णय एकतर्फी घेतले जातात, असा आरोप करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिक्षकांच्या निवड श्रेणीचे प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मंजूर झालेले असूनही शिक्षकांना अद्याप निवड श्रेणी लागू केलेली नाही. यामागचे गौड बंगाल काय असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कारभाराबाबत शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकार्यावर कारवाईसाठी निवेदन देणार असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली.
शिक्षकांकडून होतेय शिक्षकांचे सर्व्हिस बुक भरण्याचे काम!
शिक्षकांचे सर्व्हिस बुक हे शासकीय दस्तऐवज आहे. आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदार संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागाची असते. शिक्षकांनी सर्व्हिस बुक भरायचे नसते. शिक्षक फक्त आवश्यक माहिती दस्तऐवजांच्या स्वरूपात सादर करतात. शासनाने पोर्टलवर ई सर्व्हिस बुक सुरू केले आहे. हे ऑनलाईन डेटा एंट्रीचे काम देखील आस्थापना विभागाचे आहे. शिक्षक हे शैक्षणिक कर्मचारी असल्यामुळे त्यांना अशा प्रशासकीय कामासाठी शाळेबाहेर पाठवणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरते. असे असले तरी अहिल्यानगर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांकडून सर्व्हिस बुक भरण्याचे काम केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच सर्व्हिस बुक भरण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचे समोर आले आहे.
मलिद्यासाठी शिक्षकाची नेमणूक
शिक्षकांचे सर्व्हिस बुक भरण्याचे काम आस्थापना विभागाचे आहे. परंतु तेही काम शिक्षकांकडून करवून घेतले जाते. त्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून आठ आठ दिवस तेच काम करावे लागते. तसेच सर्व्हिस बुक भरण्यासाठी आर्थिक किंमत मोजावी लागते. मलिदा जमा करण्यासाठी ठराविक शिक्षकांची नेमणूकही केल्याचे समोर आले आहे. शिक्षकांना इतर शालाबाह्य कामात गंतवून मानसिक त्रास देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाते. या प्रकारामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे.
शाळा वार्यावर, शिक्षक आस्थापनाच्या कामावर!
शिक्षक व शिक्षक संघटनांच्या आरोपांमुळे अहिल्यानगर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय चर्चेत आले आहे. सर्व्हिस बूक भरणे हे काम आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचे असतांना त्या कामासाठी शिक्षकांनी नेमणूक केली जात असल्याचे वास्तव आहे. तसे आदेशच शिक्षकांना दिले जातात. दोन शिक्षक असणार्या शाळेतील शिक्षकांची आस्थापनेतील कामासाठी नेमणूक केली जात असल्याने शाळा वार्यावर सोडल्या जात आहेत.



