Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान आणि ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवडणूक आयोगाच्या टीमने बिहारचा तीन दिवसांचा दौरा केला होता. त्यांनी पाटण्यातील सर्व १२ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेऊन राज्याच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. बिहार विधानसभा निवडणूक २४३ मतदारसंघांसाठी होणार आहे. विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपत आहे. बिहार विधानसभेची शेवटची निवडणूक २०२० मध्ये तीन टप्प्यात झाली होती. तर गेल्या वर्षी ४० जागांसाठीच्या लोकसभा निवडणुका सात टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होता.
बिहार विधानसभा निवडणूक
पाटणामध्ये निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीमध्ये भाजप, जेडीयू, बहुजन समाज पक्ष, आरजेडी, आम आदमी पार्टी, काँग्रेस, सीपीआय, नॅशनल पीपल्स पार्टी, सीपीआय-एमएल, आरएलजेपी आणि लोक जनशक्ती पार्टी यांचा समावेश होता. या सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला शक्य तितक्या कमी टप्प्यात निवडणूक घेण्याची विनंती केली.
दरम्यान, २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणूक घेण्यात आली होती. कोरानाच्या काळामध्ये ही निवडणूक झाली होती. तीन टप्प्यात ही निवडणूक झाली होती. कोरोनामुळे त्यावेळी अनेक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) २४३ पैकी १२५ जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी महाआघाडीने ११० जागा जिंकल्या होत्या. इतर लहान आघाडींनी सात जागा जिंकल्या. तर फक्त एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत बिहार विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
बिहार विधानसभा निवडणुकीबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी –
– मतदान कधी? –
– निकाल कधी? –
– एकूण जागा – २४३
– अनुसूचित जातींसाठी राखीव जागा – ३८
– अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा – २
– एकूण नोंदणीकृत मतदार- ७.४२ कोटी (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत)
– पुरुष मतदार – सुमारे ३,९२,७०,८०४
– महिला मतदार – सुमारे ३,४९,८२,८२८
– ८५ वर्षांवरील मतदार – ४,०३,९८५
– १८ ते १९ वयोगटातील नवीन मतदार- १४,०१,१५०
– दिव्यांग मतदार – ७,२०,७०९
– ट्रान्सजेंडर मतदार – १७२५



