अहमदनगर / नगर सह्याद्री : शेतकऱ्यांकडून पीककर्जाची वसुली करताना व्याजाची रक्कम घेऊ नये याबाबत उपनिबंधक कार्यालयाद्वारे जिल्हा बँकेस पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ पीककर्जाची मुद्दल रक्कम भरून पुढील लाभास पात्र राहता येणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी केलेल्या आंदोलनामुळे ही बाब समोर आली होती व शेतकऱ्यांना न्याय मिळाला. परंतु 27/3/2024 रोजी आलेल्या स्मरणपत्रानंतर हा निर्णय बँकेने घेतला. परंतु त्या आधी अनेक शेतकऱ्यांनी व्याज भरले आहे. आता हे व्याज संबंधीत संस्थांना पुन्हा द्यावे अन्यथा न्यायालयात जाणार अशी मागणी कार्ले यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, बँकेचे चेअरमन व संचालक मंडळांनी दिनांक 4/3/2024 रोजी कर्ज वसूली आढावा बैठकीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज न घेण्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्धही केली होती. परंतु त्याच्या अंमलबजावणी चाबत कुठल्याही सूचना लेखी स्वरुपात बँकेला अथवा खाली देण्यात आलेले नव्हत्या. त्यामुळे त्यानी उघड उघड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दिसते. आम्ही केलेल्या आदोलनामुळे जिल्हा सहकारी बँकेने सेवा संस्थांना व्याज न घेण्याच्या सूचना दिल्याचे आम्हाला सांगितले.
परंतु अद्याप पर्यंत सदरच्या सूचना सेवा संस्थांना मिळाल्या नाहीत अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. सदर सेवा संस्थाचे सचिव आमच्या ग्रुप वर तसे पत्र आले नाहीत अशी माहिती देत आहे. शिवाय बऱ्याचशा शेतक-यांनी व्याजासह कर्ज भरलेले आहे. त्यांच्या व्याजाचे पैसे त्यांना परत मिळावेत ही आमची मागणी आहे. जमा झालेले पैसे जिल्हा सहकारी बँकेने आपल्या नफा तोटा पत्रकात दाखवू नयेत व ज्या सेवा संस्थांचे व्याज बँकेने कपात करून घेतले असेल त्या सेवा संस्थांना ते त्वरित परत करावे अशी मागणी केली आहे. याची अंमलबजावणी न केल्यास आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार अथवा माननीय न्यायालयाकडे दाद मागणार असा इशारा संदेश कार्ले यांनी दिला आहे. या पत्रकावर पंचायत समितीचे सभापती रामदास रंगनाथ भोर, राजेंद्र साहेबराव भगत, संदीप बाजीराव गुंड आदींच्या सह्या आहेत.