जालना | नगर सह्याद्री-
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षण मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या तारखेनंतर आमचे आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असे म्हटले आहे.
जरांगे यांनी आधी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे म्हटले होते. त्यानंतर आता सगेसोयर्यांनाही आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, दोन दिवसात निर्णय न झाल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल. सरकारचा नोटीस देण्यावर भर आहे, याआधी त्यांनी नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी हा प्रयोग करू नये. सरकारने २४ डिसेंबरच्या आत दिलेला शब्द पूर्ण करावा. आता काहीही झाले तरी मराठा समाज आरक्षण घेणार आहे. या दोन दिवसात निर्णय आला नाही तर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.
आईची कुणबी जात मुलाला लावा, यावर ते म्हणाले, आईची जात लावा याचा अर्थ विदर्भात मराठवाड्याची नाती आहेत. मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रातही नाते आहेत. ज्यावेळी तिकडची मुलगी सासरी येते त्यावेळी तिला तिकडे आरक्षण असते पण, तिच्या मुलाला ते आरक्षण मिळावे, ही मागणी आहे. मुलाला आईला असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यापेक्षा रक्ताचे नाते कोणते असू शकते? आम्ही मुंबईत जाणार असे कुठेही जाहीर केले नाही. त्यांनाच वाटत आहे की, आम्ही मुंबईला यावे. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.