सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात
सुनील चोभे / नगर सह्याद्री –
सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि समाजकारणातील अधोगती लक्षात घेता एकूणच देशाला पुढे नेण्यासाठी सेनापती बापट यांच्या विचारांची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध कवी व संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना कवी भालेराव बोलत होते. दया पवार साहित्य नगरी येथे आयोजित साहित्य संमेलनात त्यांच्यासह उद्घाटक प्राचार्या माहेश्वरी गावित, स्वागताध्यक्ष सचिन जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. बी. जी. शेखर, डॉ. राजेश गायकवाड, लेखक प्रा. भानुदास बेरड, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, आत्मनिर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, लेखक सचिन मोहन चोभे, सिद्धीनाथ मेटे महाराज, रामदास कोतकर आदी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वरचित आणि सेनापती बापट यांच्या विविध कविता संमेलनाध्यक्ष भालेराव यांनी सादर केल्या. त्यावेळी ते म्हणाले की, एकूणच सध्याच्या काळात आपल्याला इतिहास आणि महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून धोरण ठरवावे लागतील. महाराष्ट्र हा राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आहे. त्यासह सेनापती बापट यांच्यासारख्या मंडळींनी ही वैचारिक गुंफण कायम ठेवली आहे. त्याचाच विसर महाराष्ट्रसह देशाला पडला आहे. त्यामुळे आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने असा होणारा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
दरम्यान, सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये ग्रंथ फेरीस सुरुवात झाली. त्यांनतर ज्येष्ठ साहित्यिक जवाहर मुथा यांच्या हस्ते दिवंगत साहित्यिक संतोष शिंदे ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात आले. तर, दिवंगत साहित्यिक मुबारक तांबोळी विचारमंच याचे उद्घाटन राजेंद्र फंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवयित्री स्वाती पाटील, राजेंद्र चोभे, बेबीताई गायकवाड, शरदकुमार मेढे, आनंद शितोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड व नंदेश शिंदे यांनी केले.



