मुंबई । नगर सहयाद्री:-
सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपाचे नुकसान झाले. त्यातून थोड्याफार वाचलेल्या पिकाच्या आशेवर शेतकरी कसाबसा तग धरून राहिला. सध्या मजुरांना वाढीव दर देऊन कपाशी वेचणीची लगबग सुरू असतानाच, अवकाळी पावसाने पुन्हा थैमान घातले. पावसाच्या साडेसातीमुळे उरल्यासुरल्या कापसाच्याही वाती झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कपाशी पिके पाच ते सात फूट पाण्यात बुडाल्याने उदध्वस्त झाली आहेत. त्यामुळे काढलेले कर्ज, घेतलेली मेहनत, बियाणे व खतं-औषधं यावर खर्च केलेला खर्च वाया गेला. आता मुलांचे शिक्षण, लेकीबाळींचे लग्न कसे करावे, अशी चिंता शेतकरी वर्गात आहे. उरल्यासुरल्या पिकांनाही अवकाळीने झोडपून काढल्याने हजारो हेक्टर कपाशी पिकांना फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे भिजून झाडावर सध्या कापसाच्या वाती लोंबल्या आहेत. बोंडात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे.
तुरी उपळल्याने शेतात केवळ तुराट्या उभ्या आहेत. पावसामुळे वेचण्याही रखडल्या असून, हाती आलेल्या पांढऱ्या सोन्याला बाजारात कवडीमोल भाव आहे. दिवाळी सण होऊन दहा दिवस उलटले, तरी नुकसानभरपाई मिळालेली नाही. बंधारे फुटून रस्ते खचल्याने शेतमालाचे नुकसान होत आहे. रब्बी हंगामाअगोदर प्रशासनाने बंधारे, रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.



 
                                    
