Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने बायकोचा गळा आवळला. नंतर नवऱ्यानेही गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली असून, या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.
गोपाळ लक्ष्मण गुंड (वय वर्ष ३०) असे पतीचे, तर गायत्री गोपाळ गुंड (वय वर्ष २२) असे पत्नीचे नाव आहे. हे जोडपं दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील रहिवासी होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा प्रेम विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू होते. क्षुल्लक कारणावरून दोघेही एकमेकांशी भांडायचे.
घटनेच्या दिवशी गोपाळला राग अनावर झाला. त्यानं थेट चार्जरची वायर घेतली आणि बायकोचा गळा आवळला. यामुळे बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पतीने घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं. याची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच जवळच्या रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, ही घटना नेमकी कशामुळे घडली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या ह्रदयद्रावक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.