Maharashtra Crime: महाराष्ट्रातील जालना शहरातून कौटुंबिक वादातून घडलेल्या एका अत्यंत क्रूर हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील एका सुनेने आपल्याच सासूची भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसल्याने, आरोपी सून साथीदारासह फरार झाली आहे. ही धक्कादायक घटना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली.
सविता शिंगारे असे हत्या झालेल्या सासूचे नाव असून, प्रतीक्षा शिंगारे असे आरोपी सुनेचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक्षाने आज पहाटे कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून सासू सविता यांच्या डोक्याला भिंतीवर जोरात आपटले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिने अत्यंत निर्दयपणे सासूचा मृतदेह एका गोणीत भरून घरातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिला मृतदेह घेऊन जाण्यात यश आले नाही. दरम्यान, प्रतीक्षा शिंगारे ही पहाटे पाचच्या सुमारास घरातून एका साथीदारासोबत बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घरातून मृतदेह बाहेर नेण्यात अपयश आल्याने ती साथीदाराच्या मदतीने फरार झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.
सविता शिंगारे यांचा मुलगा आकाश संजय शिंगारे हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत असून तो कामानिमित्त लातूर येथे राहतो. त्याची पत्नी प्रतीक्षा (जी मूळची परभणीची आहे ही जालन्यात सासू सविता यांच्यासोबत राहत होती. सासू आणि सून यांच्यात नेमका कोणता कौटुंबिक वाद होता, जो इतक्या टोकाला गेला की सूनेने सासूची हत्या केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.