संगमनेर । नगर सहयाद्री:
उपनगरातील इंदिरानगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. ही घटना रविवारी समोर आली असून या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
त्यानंतर मृत्यूचे कारण निश्चित केले जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले. घरात पत्नीचा मृतदेह आढळला, तेथेच गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळून आला. पतीने पत्नीचा खून करुन स्वतः गळफास लावून आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुलदीप सुनील अडांगळे (वय ३५) आणि वैष्णवी (वय २२) हे दोघे पती-पत्नी असून काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राहत होते.
परंतु त्यांच्यात वारंवार भांडणे होत असल्याने वैष्णवी साधारण दीड महिन्यापूर्वी माहेरी संगमनेरला निघून आली. कुलदीप हा देखील संगमनेरला आला. तो वैष्णवी हिला इंदिरानगर येथील घरी घेऊन आला. मयत वैष्णवी डोक्याला गंभीर दुखापत असल्याची माहिती आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत.