Ahilyanagar Crime News: गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शिक्षकाने केला आहे. केडगाव उपनगरात प्राचार्याने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्षकावर नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुधाकर देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: नगर शहरातील केडगाव उपनगरातील एका विद्यालयातील शिक्षकाने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. अभ्यासासाठी घरी येत असलेल्या शालेय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची तक्रार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
संतोष देवरे हा ओआयसीस महाविद्यालय समोर राहत असून अल्पवयीन मुलास अभ्यासाच्या नावाखाली स्वतःच्या रूममध्ये बोलवून घेत होता. त्या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करत होता. ही गोष्ट घरी सांगितली तर आईवडीलांना मारुन टाकेल, अशी धमकीही शिक्षक संतोष देवरे हा त्या अल्पवयीन मुलास देत होता.
घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच शिक्षक संतोष देवरे हा फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी तीन पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. शिक्षक संतोष देवरे याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलाच्या आईच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.