जामखेड। नगर सहयाद्री-
दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुयातील पाटोदा (गरडाचे) येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले. गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (रा.गरडाचे पाटोदा, ता.जामखेड) हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा.जामखेड) हा ऊसतोड मजूर कामाला होता. लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षांपूर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे) याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.
याचाच मनात राग धरून दि. ३ मार्च रोजी पहाटे एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.
घटनास्थळी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असुन लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुढील तपास सपोनि गौतम तायडे हे करत आहेत.