अहिल्यानगर | नगर सह्याद्री
डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर शहर व परिसराला वेढले असतानाच सोमवारची सकाळ मात्र दाट धुक्याने वेढली गेली. यंदाच्या हिवाळ्यातले हे पहिले धुके दर्शन. ‘धुक्यात हरवली पहाट’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय सोमवारी दिसून आला.
सोमवारी पहाटे साडेपाचपासून धुक्याने नगर परिसरात फेर धरायला सुरुवात केली नि बघता बघता धुक्याची दाटी वाढायला लागली. सकाळी सात वाजता तर पूर्णपणे धुक्याने वेढून शहर व परिसरात ५० फुटांवरील जवळचेही दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांना प्रकाशझोतातही दिसत नसल्याने वाहने हळू चालवावी लागली. इतका धुक्याचा परिणाम होता. सकाळी साडेसातनंतर सूर्य उगवला तोही धुक्यातच! तो जसजसा पूर्व क्षितिजावर चढायला लागला तेव्हा धुक्याची चादर हळूहळू विरळ होऊ लागली.
अनेकांनी या गोडगुलाबी थंडीत धुके पाहण्याचा आनंदही लुटला. परंतु नगर-सोलापूर रोडवर वाळुंज चौकात सोमवारी सकाळी धुके पडल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालविण्याचा अंदाज येत नव्हता. एका ठिकाणी न दिसल्याचे गाड्या एकमेकांवर धडकल्या. त्यात काही जण जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार काही जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संतोष म्हस्के, राजू हिंगे, शशिकांत झरेकर, फिरोज पठाण, साईनाथ बनकर आदींनी वाळुंज बायपासवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था त्यांनी केली.