अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
थंडीला चांगलीच सुरुवात झाली असून, आता हुडहुडी भरू लागली आहे. रविवारी सकाळी अहिल्यानगर येथील तापमानाची नोंद १२.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. तर रविवारी रात्री थंडीत वाढ झाल्याने रात्रीचे तापमान १० अंशापर्यंत घसरले होते. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस झाला. नोव्हेंबर उजडला तरी पाऊस सुरूच होता.
मात्र, शनिवारपासून पाऊस येणार नाही, असे हवामान खात्याने जाहीर केले. त्यानंतर थंडीला चांगलीच सुरुवात झाली. रविवारी सकाळी १२.५ अंश इतके तापमान नोंदले गेले. कमाल तापमान २८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दुपारच्या वेळीही उन्हाचे चटके बसत होते. हवामान खात्याने पुणे व परिसरातील जिल्ह्यात आठवडाभर १२ ते १४ अंश इतके तापमान राहील, असे सांगितले आहे.
तसेच पुढील आठ दिवस हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील, असे सांगितले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. थंडी सुरू झाल्याने नागरिकांनी उबदार कपडे वापरायला सुरुवात केल्याचे दिसून आले. शेकोट्याही पेटल्या आहेत.



