अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तपोवन रस्ता परिसरातून अपहरण केलेल्या युवकाची मारहाण करून जाळून टाकल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शहरात खळबळजनक प्रकार घडला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. इतर संशयित आरोपी पसार झाले आहेत.
निंबळक शिवारात राजू कोतकर यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानासमोर रविवारी सायंकाळी वाद झाले. मात्र या वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा संतोष धोत्रे व त्याच्या साथीदारांनी राजू कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजेंद्र पोपट कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक, ता.जि. अहिल्यानगर) यांच्या सांगण्यावरुन संतोष धोत्रे (रा. नागापूर, जि. अहिल्यानगर), मट्टस उर्फ अजय सोमनाथ गुळवे (रा. लामखडे चौक, एमआयडीसी), अमोल आव्हाड (पूर्ण नाव माहित नाही), अभि गायकवाड (रा. नागापूर), विशाल पाटोळे (रा. गणेश चौक बोल्हेगाव), सुधीर प्रदिप दळवी (रा. नागापूर), आबा गोरे (पूर्ण नाव माहित नाही), शरद जगन पाटोळे (रा. नागापूर) यांच्यासह तीन-चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसण्या पैशावरुन राडा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, हल्ला करणारा संशयित संतोष धोत्रे व त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू केला आहे.
हल्याच्या निषेधार्थ गाव बंद
निंबळक येथे किराणा दुकानदारावर वीस ते पंचवीस हल्लेखोरांनी केलेल्या हल्याच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन केले. हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, दहशतीला आळा घालण्याची कोतकर कुटुंबियांसह, ग्रामस्थांनी मागणी केली. निंबळक येथे रविवारी कोतकर वस्तीवर असणाऱ्या गणेश किराणा दुकानावर अज्ञात पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने येऊन अचानक दुकानावर हल्ला चढवला. दुकानांमध्ये संदिप कोतकर यांची आई असताना या तरुणांनी या दुकानातील तेलाचे डबे किराणामाल बाहेर फेकण्यास सुरुवात केली.
घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद
यावेळी कोतकर यांची आई बाहेर आले असता तिलाही त्यांनी दमदाटी करून बाहेर ढकलली. यावेळीस हा घटनाक्रम चालू असतानाच त्यांचे बंधू संदिप कोतकर, विलास कोतकर व राजेंद्र कोतकर हे तेथे आले. त्यांनाही लाकडी दांडक्याने, तलवारीने, चोपरने वार करण्यात आले. दुकान पेटवून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशन व पोलीस उपधीक्षक यांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
खुलेआम अवैध धंदे सुरु
आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या निषेधार्थ सोमवारी निंबळक गाव बंद ठेवण्यात आले. या आंदोलनामध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागापूर एमआयडीसी, बोलेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी चालू आहे, तसेच अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. टपऱ्यावरही दारूचे अड्डे बनलेले आहेत, याचा गैरफायदा येथील लोक घेत आहे असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
एमआयडीसी पोलिसांचा धाक संपला, टोळक्याचा दुकान जाळण्याचा प्रयत्न
एमआयडीसी परिसरात टोकळ्याकडून व्यावसायिक तिघा बंधूंवर जीव घेणा हल्ला करण्यात आला. तसेच कोतकर यांचे किराणा दुकान जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. टोळक्याकडून दहशत पसरवली जाते. व्यावसायिकांना मारहाण, दुुकान पेटविले जात असेल तर एमआयडीसी पोलीस नेमकं काय करतेय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.