मुंबई | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लागलीच पुढच्याच आठवड्यात राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अपेक्षीत आहे. तसे संकेत अधिकृत सुत्रांकडून प्राप्त झाले आहेत. काहींना मंत्रिमंडळावर नियुक्ती मध्ये प्राधान्य देऊन यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. विशेषतः काही नवीन चेहर्यांना यामध्ये संधी देण्याची दाट शयता आहे. दरम्यान शिंदे गटाकडून कोणाची वर्णी लागते याहीपेक्षा अजित पवार गटाकडून त्यांच्या कोट्यातील रिक्त असणार्या मंत्रीपदाच्या जागांपैकी राज्यमंत्रीपदावर नगरचे आ. संग्राम जगताप यांची वर्णी लागणार असल्याचे माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळली जाणार असून त्याद्वारे युवा मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
लोकसभा निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येणार आहे. सध्या बर्याच मंत्र्यांकडे मोठ्या प्रमाणात खाती असल्याने त्यांना त्या विभागांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. भाजप ,राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेच्या कुठल्या आमदाराला मंत्री पद मिळेल याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही त्यांची महामंडळावर नियुक्ती करून नाराजी दूर करण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो आणि कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होतो यावर विस्तारातील संधी अवलंबून आहेत. सहकाराची पंढरी समजल्या जाणार्या नगरमध्ये शरद पवार गटाला शह देण्यासाठी आणि आपल्या पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी अजित पवार यांनी नगरकडे विशेष लक्ष दिले असल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणूक जाहीर होताच लंके यांनी सोडचिठ्ठी देताच लंके यांना शह देण्यासह नगर जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी त्याचवेळी भूमिका घेतली होती. आता विस्ताराच्या संधीत आ. संग्राम जगताप यांना संधी देऊन अजित पवार हे नवी चाल खेळणार असल्याचे सांगण्यात येते.