अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. जिल्हा परिषद अध्यक्षपद राखीव झाल्याने जिल्हयातील दिग्गज नेत्यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये नगर जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने अधिसूचना जारी करत आरक्षण सोडत जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, अध्यक्षपद आरक्षित झाल्याने आता त्यांचे स्वप्न भंगले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची अंतिम रचना जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे दोन गट आणि चार गण वाढले आहेत. किरकोळ बदल वगळता गट आणि गण रचना जैसे थे आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. लवकरच जिल्हा परिषद गट व गणांची आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने गावपुढार्यांनीही जनसंपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमांना हजेरी लावली जात आहे. अडीच वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि पंचायत समित्यांचे १५० गण झाले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समित्यांसाठी १४६ गण होते.
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण
अनुसुचित जाती १, अनुसुचित जाती (महिला) १, अनुसुचित जमाती (महिला) १, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) २, सर्वसाधारण प्रवर्ग ३, सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) ३ असे अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण निघाले आहे. परंतु, कोणत्या पंचायत समितीसाठी कोणते आरक्षण अद्याप निघालेले नाही.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण
ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)