अमरावती । नगर सहयाद्री:-
अमरावती मधील वरुड तालुक्यातील पुसला गावात आनंदाचा लग्नसोहळा काही क्षणातच शोकांतिकेत बदलला. थाटामाटात लग्न पार पडताच अवघ्या अर्ध्या तासात नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अमोल गोड असे मृत नवरदेवाचे नाव असून या दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमोल गोड यांचा विवाह मंगल वातावरणात पार पडला होता. मात्र, लग्नानंतर काही वेळातच त्यांना अचानक चक्कर आल्याने मंडपात खळबळ उडाली. पाहुण्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आनंदी वातावरणात काही क्षणातच शोककळा पसरल्याने वधूपक्ष आणि वरपक्षावर दु:खाचा डोंगर कोसळला. जिथे काही वेळापूर्वी सनईचे सूर घुमत होते, त्याच ठिकाणी मृत्यूच्या बातमीने शांतता पसरली. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरलेला हा समारंभ नवरीसाठी आयुष्यभराचे दुःख देऊन गेला. अमोल गोड हे पुसला गावात कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांचा कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू स्वभाव होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.



