नगर सह्याद्री इम्पॅक्ट
अहमदनगर | नगर सह्याद्री
लाचेच्या सापळ्यात सापडल्यानंतर आणि गुन्हा दाखल होऊनही महसूल सेवेत ठिय्या मांडून बसलेल्या सावेडीच्या लाचखोर सर्कल देवकाते हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी या संपूर्ण प्रक्रियेची दखल घेत सावेडी सर्कल श्रीमती देवकाते हिच्यासह सावेडी तलाठी सागर भापकर या दोघांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, देवकाते यांच्या निलंबनाचे वृत्त येताच सावेडीकरांनी पेढे वाटून या वृत्ताचे स्वागत केले. दरम्यान, देवकाते यांच्या भानगडी आणि त्यांना पाठीशी का घातले जात आहे. याबाबत नगर सह्याद्रीने सातत्याने आवाज उठवला होता. अखेर त्या वृत्ताची दखल घेत देवकाते आणि भापकर या दोघांनाही निलंबनास सामोरे जावे लागले आहे.
नगर शहरातील महसूल विभागाच्या सावेडी सर्कल (मंडळाधिकारी) सहा महिन्यांपूर्वी लाचेच्या जाळ्यात अडकल्या. लागलीच त्या पसार झाल्या. त्याची पडताळणी चार महिन्यानंतर झाली म्हणजेच दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच त्या पुन्हा पसार झाल्या. दोनदा पसार झाल्यानंतरही त्यांच्यावर नाशिक महसूल आयुक्तांसह नगरचे जिल्हाधिकारी ‘मेहेरबान’ झाले की काय अशी शंका व्यक्त होत होती.
लाचेसारख्या गंभीर प्रकारात अडकल्यानंतरही त्या पुन्हा सावेडी सर्कल म्हणून हजर झाल्याचे वृत्त आम्ही दिले होते. सावेडीकरांनी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. त्या लाचेच्या गुन्ह्यात अडकल्या. मात्र, तरीही त्या सावेडीकरांच्या नाकावर टिच्चून त्याच सावेडीकरांसाठी सर्कल म्हणून हजर झाल्यात आणि तोर्यात काम देखील पाहू लागल्या होत्या. ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्या सातबारासह अन्य रेकॉर्ड खराब करण्याचे काम त्या करु लागल्या होत्या.
दरम्यान याबाबतचे वृत्त ‘नगर सह्याद्री’ने प्रसिद्ध करताच जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेतली आणि दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. याबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दि. २६ रोजी सायंकाळी काढले आणि त्यानुसार दोघेही महसूल सेवेतून निलंबीत करण्यात आले. दरम्यान, या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवप्रहार संघटनेचे गोरक्षनाथ आढाव यांनीही केली होती.