Crime: राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेवरून महाराष्ट्र पेटला होता.त्यानंतर असाच आणखी एक प्रकार समोर
आल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने राजगुरुनगर हादरले आहे. दुर्वा मकवाणे (८ वर्षे) आणि कार्तिकी मकवाणे (९ वर्षे) अशी हत्या झालेल्या बहिणींची नावं आहेत. घराच्या वरच्या मजल्यावर रहाणाऱ्या आचारी काम करणाऱ्या व्यक्तीने या दोन चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिमुकल्या मुलींनी आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपीने दोघींची हत्या केली आहे.
पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आहे. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले अन तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.
आता आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा देखील तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील एका ड्रममध्ये दोघींचे मृतदेह ठेवले. राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पण या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.