कोल्हापूर । नगर सहयाद्री
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत असतानाच, बोरबेट येथील एका गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाने डोळे उघडण्याआधीच हे जग सोडले. पुराच्या पाण्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्या मातेला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणारे 108 रुग्णवाहिकेतील डॉ. स्वप्नील तमखाने आणि चालक सतीश कांबळे हे तिच्यासाठी खरे देवदूत ठरले.
बोरबेट (ता. गगनबावडा) येथील कल्पना आनंदा डुकरे (वय ३३) यांना मंगळवारी सकाळी प्रसुती वेदना सुरु झाल्या. मुसळधार पावसामुळे गगनबावडा तालुक्यातील रस्ते व नदी ओढ्यांना पूर आला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने त्यांना गगनबावड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र परिस्थितीच्या गांभीर्यामुळे त्वरित कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णवाहिकेतून नेत असताना खोकुर्ले येथील पडवळवाडी परिसरातच कल्पना यांची प्रसूती झाली. ही प्रसूती सातव्या महिन्यात झाली होती. बाळाचा जन्म असमयी झाल्याने आणि त्याचे वजन कमी असल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
गर्भवती महिलेला कोल्हापूरला पोहचवणे अत्यंत कठीण होते. गगनबावडा कोल्हापूर मुख्य रस्त्यावर खोकुर्ले परिसरात पूर असल्याने निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 108 रुग्णवाहिकेतील डॉ. स्वप्नील तमखाने आणि चालक सतीश कांबळे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कल्पना डुकरे यांना स्ट्रेचरवरून पुराचे पाणी पार करून नेले. किरवे येथे दुसरी 108 रुग्णवाहिका घेऊन त्यांना पुढे कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत कल्पना डुकरे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रसंग अतिशय हृदयद्रावक असला तरी ज्या धाडसी आणि संवेदनशीलतेने आरोग्य कर्मचारी आणि चालक यांनी आपले कर्तव्य निभावले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.