पारनेर तालुक्यातील सोसायट्या अन् पतसंस्थांमध्ये कुरण असल्यागत चरणार्या गणेश औटीवर कोण झाले मेहेरबान?
पारनेर | नगर सह्याद्री
राजे शिवाजी अन् गोरेश्वर या दोन पतसंस्था अडचणीत आणण्यात अत्यंत मोलाची आणि महत्वपूर्ण भूमिका पोपट ढवळे यानेच बजावली. मात्र, त्याहीपेक्षा महत्वपूर्ण भूमिका बजावली पारनेरचे तत्कालीन सहायक निबंधक गणेश औटी याने! गणेश औटी याच्या सुरस कथा आता चांगल्याच बाहेर येऊ लागल्या आहेत. मात्र, त्याहीपेक्षा पोपट ढवळे याच्या अटकेने अनेकांच्या बत्या गुल झाल्या आहेत. ढवळे याने पतसंस्थांना ठगवून कोट्यवधी रुपये आणले आणि त्यातून त्याने अनेक व्यवहार केले. हे व्यवहार त्याने तालुक्यातील आणि तालुक्या बाहेरील तीन- चार मातब्बर राजकारण्यांना फिरवले. त्यात पंचायत समितीचा एक माजी पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचा एक माजी पदाधिकारी आहे. ढवळे याने पतसंस्थांना ठगविल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून मालमत्ता घेतल्या आणि त्याच मालमत्ता अवघ्या महिना- दोन महिन्यात बड्या धेंडांना विकल्या! आता त्या मालमत्तांवर टाच आणण्याची मागणी ठेवीदारांकडून पुढे आल्याने अनेकांच्या बत्त्या गुल झाल्या आहेत. या सार्यांना सहआरोपी करण्याची मागणी त्यातूनच पुढे आली आहे.
गणेश औटी हे पाप निलेश लंके आणि विखे पाटलांचेही!
गणेश औटी याचे मुळ गाव पारनेर शहर! पारनेरचाच भूमिपुत्र असताना त्याने सहकारी संस्था चांगल्या चालतील याची काळजी घेण्यापेक्षा त्या संस्थांचे वाटोळे कसे होईल याचाच विडा उचलला! बोगस मतदार वाढविणे आणि बोगस मतपत्रिका तयार करुन त्या मतपेटीत टाकण्याचे टेंडर त्याने त्याच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक वि. का. सेवा सोसायट्यांमध्ये राबविले. कुरणात सोडलेल्या जनावरासारखा हा गणेश औटी तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये पोट फुटेस्तोवर चरला! तत्कालीन आमदार निलेश लंके यांनी त्यास आधी अभय दिले. बाजार समिती निवडणुकीत हा गणेश आ. लंके यांचा कार्यकर्ता झाला होता. यानंतर गणेशबद्दल तक्रारी झाल्या! त्यानंतर या गणेशने विखे पाटलांचे पाय धरले! विखे पाटलांचे पाय धरल्याचे आ. लंके यांना समजताच त्यांनी त्यास ‘घोडे’ लावले! हीच त्याची बक्षीसी ठरली आणि तालुक्यात तो आणखी जोमात पाय रोवून राहिला. आधी निलेश लंके यांच्या आशीर्वादाने आणि नंतर विखे पाटलांच्या आशीर्वादाने त्याने तालुक्यात हप्ता घेतला नाही अशी एकही सोसायटी अन् पतसंस्था सोडली नाही.
सहकारी संस्थांचे वाटोळे करणार्या गणेश औटीवर काय कारवाई होणार?
तालुक्यातील अनेक पतसंस्था आणि सोसायट्यांमध्ये बिनदिक्कतपणे कुरणासारख्या चरत राहिलेल्या गणेश औटी या अधिकार्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या! औटी याने अनेक संस्थांचे कंबरडे मोडले. हप्तेखोरी केली. त्यातून काही संस्थांना टाळे लागले. मात्र, त्याला फक्त आणि फक्त पैसा दिसत होता. त्याच्याबद्दलच्या तक्रारी वाढल्या आणि त्याने नगर मुख्यालयात बदली करून घेतली. नगर मुख्यालयात बदली झाली असली तरी त्याचे संपूर्ण लक्ष पारनेरमध्येच असते. तालुक्यातील दोन- तीन मोठ्या पतसंस्थांमध्ये त्याची प्रशासक म्हणून नियुक्ती कशी आणि कोणी केली यासह त्याच्यावर कोणती कारवाई होणार असा प्रश्न आता संस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
भूखंड मागण्यापर्यंत गेली होती गणेश औटी याची मजल!
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे तालुका सहकारी औद्योगिक वसाहत आहे. या संस्थेच्या तपासणी आणि निवडणूक कागदपत्रांच्या अनुषंगाने याच गणेश औटी याने संस्थेच्या पदाधिकार्यांना बोलावून घेतले. संस्था व्यवस्थीत चालवायची असेल तर या वसाहतीमध्ये मला एक भूखंड द्यावा लागेल आणि तसे कले नाही तर संस्थेच्या बाबत मला निर्णय घ्यावा लागेल अशी धमकीच या गणेश औटी याने दिली. यानंतर संबंधित संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि त्याच गणेश औटी याला संचालकांनी फोन लावून थेट जाब विचारला! यानंतर त्याने माफीनामा दिला आणि प्रकरणावर पडदा पडला होता.
आ. काशिनाथ दाते यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष!
पारनेरचे विद्यमान आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली पारनेर ग्रामीण पतसंस्था कार्यरत आहे. या संस्थेचा कारभार आणि ठेवीही चांगल्या आहेत. या संस्थेला देखील गणेश औटी याने प्रचंड त्रास दिला. या संस्थेच्या चौकशा लावण्यापर्यंत या गणेश औटीची मजल गेली होती. आमदार होण्याआधी काशिनाथ दाते हे जिल्हा परिषदेचे सभापती होते. विखे पाटलांचे अत्यंत जवळचे विश्वासू राहिले असतानाही याच काशिनाथ दाते यांना औटी याच्या कार्यपद्धतीचा त्रास झाला. त्यातूनच त्यावेळी काशिनाथ दाते यांनी गणेश औटी याच्याबद्दल तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर औटी याने जरा नमते घेतले. आता हेच काशिनाथ दाते आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता ते या गणेश औटी याच्याबद्दल काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नीलेश लंकेंना पावन केले अन् गणेश सुसाट सुटला!
गणेश औटी याचे मुळ गाव पारनेर! शिक्षण देखील त्याचे येथेच झाले. पुढे उच्च शिक्षणानंतर त्याची सहकार खात्यात अधिकारी म्हणून निवड झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आ. निलेश लंके यांच्या ‘लगारी’ला लागून त्यांच्याच शिफारशीवर त्याची पारनेरमध्ये बदली झाली. बदली होताच आणि कार्यभार घेताच त्याने निलेश लंके यांचा कार्यकर्ता असल्यागत कामकाज सुरू केले. त्यांच्यासाठी वाट्टेल ते करणारा हा गणेश देहभान विसरुन रात्री- अपरात्री कार्यकर्त्यासारखा राबला. हे सारे करताना त्याने हातात कुर्हाडच घेतली होती. यासाठी दोन- चार जणांची टोळीच त्याने तयार केली होती. संस्थांना प्रचंड त्रास होत असताना त्याबाबत कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. कारण, तो तत्कालीन आमदार निलेश लंके यांच्या गळ्यातील ताईत झाला होता. सुसाट सुटलेल्या गणेशचा वेग प्रचंड होता. मात्र, त्याला अटकाव करण्याची हिंम्मत लंके यांच्यात देखील नव्हती. कारण, ते सांगतील ते काम तो चुटकीसरशी करत होता.
विखेंच्या पाया पडून माफीनामा दिला अन् गणेशची गाडी आणखी सुसाट सुटली!
नीलेश लंके यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या गणेश औटी याच्या तक्रारी वाढत चालल्या होत्या! राज्यात महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुतीचे सरकार आले. त्या दोन्ही सरकारमध्ये निलेश लंके हे होतेच! त्यामुळे गणेश औटी याचा बाल बाका होत नव्हता! उसाच्या शेतात पळणार्या गणेशच्या अंगावर साधा ओरखडा देखील दिसत नव्हता! त्याचे कारण होते त्याला मिळालेला राजाश्रय! मात्र, लंके यांनी महायुती सोडताच गणेशची पंचाईत झाली. लागलीच त्याने विखे पाटलांचे वाड्यावर जाऊन पाय धरले. विखे पाटलांनीही मग त्याच गणेशचा वापर करण्यास सुरुवात केली आणि त्याच गणेशच्या हातून निलेश लंके व त्यांच्या समर्थकांच्या संस्था अडचणीत आणण्याचे काम झाले. यामुळे लंके व त्यांचे समर्थक याच गणेश औटीच्या नावाने शिमगा करू लागले आणि गणेशने विखे पाटलांचा आश्रय घेतला! मात्र, हे सारे करताना त्याचा वसुली पॅटर्नमधील हप्ता आणि त्या हप्त्याची रक्कम दुप्पट झाली! त्यातून संस्था आणखी अडचणीत आल्या!
गणेशला पाठीशी घालणार्यांना नक्की अपेक्षीत काय आहे?
कुरण असल्यागत चरला! जहागीरी मिळाल्यागत तालुक्यातील सहकारी संस्थांचे वाटोळे होईपर्यंत त्याने पोटफुटेस्तोवर काम केले. लंके आणि विखे पाटील या दोघांनीही त्या गणेशच्या माध्यमातून तालुक्यातील सहकारी संस्थांसाठी मोठा अडसर ठरलेल्या गणेशला पाठीशी घालण्याचे ‘पाप’ केले. आता त्याने ‘टेंडर’ भरुन नगर मुख्यालयात बदली करून घेतली. मात्र, त्यासाठी त्याने हे टेंडर नक्की कोणाचे भरले असा प्रश्न आहे. गणेश सारख्या अपप्रवृत्तीमुळे तालुक्यातील सहकारी पतसंस्था आणि सोसायट्यांना अत्यंत वाईट दिवस आले असताना त्याला पाठीशी घालणार्यांना नक्की काय अपेक्षीत आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.