माजी सभापती भानुदास कोतकर; बाजार समितीत स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भाजप नेते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मात निधनाने सर्वांवर दुखांचा डोंगर कोसळला आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हा स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. त्यांच्याच नेतृत्वाखाली चिचोंडी पाटील येथे उपबाजारचे काम सुरु झाले असून बाजार समितीच्या कामकाजात सुसत्रता आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाने त्यांच्या पश्चात बाजार समितीचा कारभार युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याच नेतृत्वाखाली चालणार आहे. सर्वांनी अक्षयदादा कर्डिले यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहाणे हीच खरी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल असे मत माजी सभापती भानुदास कोतकर यांनी मांडले.
मा. खा. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डिले, सुधीर भापकर, संजय गिरवले, मधुकर मगर, दत्तात्रय तापकिरे, भाऊ भोर, राजू आंबेकर, सुभाष निमसे, धर्मनाथ आव्हाड, राजेंद्र बोथरा, मंजाबापू घोरपडे, रामदास सोनवणे, निलेश सातपुते, भाऊसाहेब ठोंबे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सचिव अभय भिसे, सहसचिव सचिन सातपुते, सहसचिव बाळासाहेब लबडे यांच्यासह संचालक, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संचालकांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गेल्या दहा-पंधरा वर्षापासून बाजार समितीचा कारभार आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. बाजार समितीने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. सर्वसामान्यांच्या सुख दुखात कर्डिले यांनी वाहून घेतले होते. त्यामुळे प्रत्येकाशी त्यांची नाळ जोडली गेली होती. नगर-राहुरी-पाथड मतदारसंघातील आणि नगर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. सर्वांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना जशी साथ दिली तशीच साथ आता श्री. अक्षय कर्डिले यांना द्यावी असे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी सांगितले.



 
                                    
