Crime News Ahilyanagar: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या युवकाचा मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्यआढळल्याची घटना समोर आली आहे. रणजीत सुनील गिरी (वय 23) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक माहिती अशी: बीड येथे राहणारा रणजीत सुनील गिरी हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. त्याच्यावर मिरजगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारीपासून तो कर्जत येथील पोलीस कोठडीतच होता. तीन महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांची संपर्क केल्यावर फोनवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता.
मात्र कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. मयत युवकाच्या गळ्याभोवती जखम व फाशी दिल्यासारखा व्रण आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.