अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर जिल्ह्यातील कसारा दुमाला (ता. संगमनेर) येथून ६ वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पथकाला अखेर यश आले असून अपहृत मुलगी व तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला चाकण (जि.पुणे) येथे पकडण्यात आले आहे. यातील आरोपी अतुल कैलास जाधव (रा. सहारा सिटी, म्हाळुंगे, ता. चाकण) यास पुढील कार्यवाही साठी संगमनेर शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
कसारा दुमाला येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने दि.१९ जुलै २०१९ रोजी फुस लावुन पळवुन नेले होते. सदर बाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो भा.दं.वि. कलम ३७० हे वाढीव कलम लावून तपासकामी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे हे करीत होते.
गुन्ह्याचा तपास करताना पो.नि. राजेंद्र इंगळे व शाखेचे अधिकारी,अंमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गाने व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन शोध घेतला असता अशी माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील अपहरीत मुलगी हिला यातील आरोपी अतुल कैलास जाधव हा चाकण येथे घेवून राहत आहे. अशी माहिती मिळाल्याने पो.नि. राजेंद्र इंगळे, उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी पोलिस पथकासह चाकण येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीचा व अपहरीत मुलीचा शोध घेतला असता अपहरीत मुलगी व आरोपी अतुल जाधव हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधिक्षक गणेश उगले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पो.हे.कॉ. समीर सय्यद, महिला पो.हे.कॉ. अनिता पवार, महिला पो.कॉ. छाया रांधवन, चालक पो.कॉ. गोरे यांच्या पथकाने केली आहे.