अवघा देश राममय। श्रीरामलल्लांची अभिनित मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापणा
अयोध्या | नगर सह्याद्री
आज आपले राम आले, प्रतिक्षा संपली. धैर्य, बलिदान, त्याग, तपस्या याचे फळ मिळाले, आपले राम अखेर आले, असे भावनिक उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य, दिव्य, सक्षम भारत निर्माणाची शपथ उपस्थितांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली.
पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल होते. रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठावेळी हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाची विधीवत पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली. हा सोहळा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्यानगरीत भक्तांचा महासागर उसळला होता. फक्त अयोध्याच नव्हे, तर अवघा देश ’राम’मय झाला. महाराष्ट्रातही राम भक्तांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला. अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट, अनुपम खेर, विवेक ओबेराय, खेळाडू सानिया नेहवाल, अनिल कुंबळे, विराट कोहली आदींचा समावेश होता.
प्राणप्रतिष्ठेनंतर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, गर्भगृहातील प्रत्येक क्षण रोमांचित करणारा होता. खूप काही सांगायचे, बोलण्यासाठी कंठ अतृप्त आहे. आपले राम आता टेंटमध्ये नव्हे, तर भव्य राम मंदिरात राहतील. रामलल्लाच्या आगमनाची अनुभवती देशच नव्हे तर विश्वातील रामभक्तांना येईल. राम भारताचा आधार, चेतना, चिंतन, प्रतिष्ठा, प्रभाव आहे. आजचा क्षण कालचक्रात कायम चर्चेत राहील. कायम स्मरणात राहील. देशात उत्साह आहे, नवा विश्वास निर्माण झाला आहे. या क्षणाला आपण आगामी अनेक वर्षे जगत राहू. गुलामीची मानसिकता तोडून हे मंदिर उभे राहिले आहे. मंदिर तयार करण्यासाठी एवढे वर्षे लागली, यासाठी श्री प्रभू रामाची माफी मागतो. त्रेता युगात चौदा वर्षानंतर रामाचे आगमन झाले, तो चौदा वर्षांचा वियोग होता; पण आपल्या देशवासियांना हा वियोग शेकडो वर्षे सहन करावा लागला. याच बरोबर न्यायपालिकांचे कौतूकही करायले हवे. त्यांनी न्याय दिला, न्यायाची लाज राखली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज यांचे भाषण झाले.अयोध्येत २५ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये केंद्रीय पोलिसांचाही समावेश आहे. विमानतळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असणारा मार्ग एसपीजीच्या निरीक्षणाखाली होता. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था भक्कम असल्याची खात्री केली.