Crime : संशयाच्या सुईने अकरा महिन्यापूर्वी थाटलेला संसाराची राखरांगोळी केली आहे. पतीने पत्नीची सासुरवाडीत जाऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती विठ्ठल वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: विठ्ठल वाघ व भारती यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवस गुण्यागोविंदाने गेले. मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले होते. कायम वाद होऊ लागल्यामुळे दोघे पुन्हा गावी राहण्यास गेले. तेथेही भारतीला त्रास सुरू होता. यामुळे भारतीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान भारतीचे वडील ८ डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले. मात्र १६ डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना, भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगीच होती. याच वेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल वाघ हा दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे आला. यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला.
दोघांमधील हा वाद विकोपाला गेला. यातच विठ्ठल वाघ याने चक्राकार दात्र्या असलेला लोखंडी रॉडने भारतीच्या डोक्यात जोरदार वार केला. यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. याबाबतर शेजाऱ्याने तिच्या वडिलांना माहिती दिली. यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.