जामखेड। नगर सहयाद्री
राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे, मात्र हा निकाल आश्चर्यजनक असणारा असून अजित पवार गटाच्या विरोधात निर्णय घेतल जाईल विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचे मात्र त्याचवेळी एकाची ताकद संपवण्याचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद संपवली जाईल असा विश्वास रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
तालुक्यातील खर्डा येथे संत गितेबाबा यांच्या मठाच्या विविध कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर अयोजीत पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार बोलत होते. शरद पवार यांच्या वया वरून अजित पवारांकडून वारंवार मुद्दा समोर आणला जात असताना भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली.
भाजप सगळ्यांनाच ऑफर देते, त्यांच्याकडे 80 वर्ष वय झालेले लोक खासदार झालेले आहेत. मात्र कुठेतरी अजितदादा मित्र मंडळाचे नेते जो वयाचा मुद्दा पवार साहेबांबद्दल बोलतात त्याला पाठबळ देण्याचं भाजप काम करत असताना दुसरीकडे अशा ऑफर दिल्या जात असल्याचे रोहित पवार म्हणाले.
दिल्लीमध्ये चर्चा नव्हे तर आदेश दिले जातात आणि त्यामुळे कुठेतरी कुणाला सहा जागा कोणाला आठ जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे. आणि राहिलेल्या जागा हे भाजप लढवेल असे चित्र दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजप मध्ये हुकूमशाही तर आमच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मधे लोकशाही असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.