वाढता जातीय तणाव नक्की कोणाला अभिप्रेत आहे? प्रशासनाला की राजकारण्यांना? नगरकरांच्या मानगुटीवर जातीय दंगलीचे सावट
सारीपाट / शिवाजी शिर्के
कधीकाळी हिंदू- मुुस्लिम जातीय दंगलीसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या राज्यातील प्रमुख तीन शहरांमध्ये मालेगाव, भिवंडी या शहरांच्या खालोखाल नगर शहराचे नाव घेतले जायचे! गेली काही वर्षे नगर शहर त्याला अपवाद ठरले. मात्र, आता हेच नगर शहर यासाठी पहिल्या क्रमांकावर येते की काय अशी शंका येऊ लागली आहे. हिंदू- मुुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप करणाऱ्यांपासून ते अगदी ज्यांच्यावर याबाबत अप्रत्यक्षपणे आरोप केला जात आहे अशी सारी मंडळी याला कारणीभूत ठरली आहेत. साऱ्यांनाच राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्याला कोणीच अपवाद नाहीत! कालच्या नगरमधील राड्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांच्यासह; जे जेलमध्ये गेलेत अशा साऱ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जातीय दंगलीचे शहर ही नवी ओळख नगर शहरासाठी हवी आहे की काय? ही नवी ओळख साऱ्यांनाच महागात पाडणारी ठरणार आहे. राजकारण्यांना त्यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या असतील तर प्रशासनातील आणि त्यातही पोलिस प्रशासनाने खमकी भूमिका घेण्याची गरज आहे. रांगोळीच्या निमित्ताने जे घडले तो फक्त ट्रेलरच दिसलाय! याला वेळीच आवर घातला गेला नाही तर येत्या काही दिवसात दंगलीचा संपूर्ण पिक्चर समोर आल्यास आश्चर्य वाटू नये!
वादग्रस्त रांगोळी काढण्यास सांगणारे कोण?
नगर शहरातील राजकारण खालच्या पातळीवर गेल्याचा आरोप केला जात असला तरी असा आरोप करणाऱ्यांनीही आत्मभान तपासण्याची आवश्यकता आहे. रांगोळी काढली जात असताना त्याला अटकाव करण्याचे काम कोणीच का केले नाही? ही रांगोळी ठरवून काढली असेल तर त्याबाबत आता पोलिसांना कठोर भूमिका घ्यावीच लागणार आहे. रांगोळी काढणाऱ्या आरोपींना अटक केले म्हणजे काम संपले असे नाही, त्या आरोपींना अशी रांगोळी काढण्यास कोणी सांगितले याचाही शोध घेण्याची गरज आहे.
पोलिसांची बोटचेपी भूमिकाच ठरली कारणीभूत!
लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेेल्या विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी समोर आल्यापासूनच नगर शहरात हिंदू- मुस्लिम समाजात दरी निर्माण झाली हे स्पष्टपणे समोर आले होते. या दोन समाजातील ही दरी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सलोख्याचे कोणतेच प्रयत्न झाले नाही. किरकोळ घटनेत दोन समाजात वाद निर्माण होत होते आणि सोशल मिडियावर दोन्ही समाज एकमेकांना प्रत्युत्तर देताना कंबरेखालची भाषा वापरत होता. तरीही त्याची दखल घ्यावी असे पोलिसांना का वाटले नाही?
दर्ग्यात हिंदू बांधव; तरीही कशी घडली दंगल!
नगर शहरातील मुस्लिम बहुलभाग असणाऱ्या फकीरवाडा, सर्जेपुरा, मंगलगेट, मुकुंदनगर येथील दर्ग्यात आजही हिंदू समाजातील लोक जातात. नवस बोलतात आणि त्यानिमित्ताने शेरणी वाटप केली जाते हे वास्तव सत्य! रांगोळीच्या मुद्यावर टोकाची भूमिका खरच गरज होती का? ज्यांनी रांगोळी काढली त्यांना पोलिसांनी अटक केली असतानाही ज्या पद्धतीने त्यावर मुुस्लीम समाजातील काही समाजकंटकांनी रिॲक्शन दिली ती नक्कीच समर्थनीय नाही. पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत मजल जात असेल आणि अगदी ठरवून हिंदू देवदवतांची नावे लिहीलेल्या वाहनांवर दगडफेक, त्यांच्या काचा फोडल्या जात असतील तर त्यातून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष भावना निर्माण होणारच! त्यात गैर काहीच नाही.
जातीतील खुज्या विचारांना मुठमाती देणारे सिमोल्लंघन होणार का?
नगर शहरात जे काही घडले ते दोन्ही समाजासाठी नक्कीच भूषणावह नाही. विजयादशमीच्या सणाला सामोरे जात असताना जातीचे विष पेरणाऱ्या खुज्या विचारांना मुठमाती देत नव्या विचारांचे सीमोल्लंघन नक्कीच होऊ शकते. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या मनातील जुन्या, संकुचित आणि नकोशा असलेल्या विचारांवर मात करून पुढे जाणे आणि नवे विचार अंगीकारणे. हे केवळ प्रतीकात्मक नसून, स्वतःच्या वृत्तीमध्ये अंतर्मुख होऊन सुधारणा करण्याच्या प्रक्रियेतूनच ते शक्य होत आले आहे आणि होणार आहे. खरेतर हिंदू आणि मुस्लिम समाजातील काही घटकांनी यानिमित्ताने एकत्र येऊन या नव्या विचारांचं सिमोल्लंघन करण्याची गरज आहे. दर्ग्यात जाऊन हिंदू लोक चादर अर्पण करत शांतता नांदण्याची विनंती अल्लाहकडे करत असतील तर विजयादशमीच्या निमित्ताने जाती-जातीत विष पेरणाऱ्या विचारांना मुठमाती देण्यासह खुज्या विचारांचं सिमोल्लघन करण्याची गरज नक्कीच आहे. हा प्रयत्न होण्यासाठी दोन्ही बाजूने पुढाकार घेतला तर दंगलीच्या उंबरठ्यावर उभे दिसणारे हे शहर पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने नांदताना दिसेल इतकेच!
जातीय तणावातून खाकीची बेईज्जती झाली त्याचे काय?
सर्वात महत्वाचे म्हणजे नगर शहरातील पोलिसांची पुरती बेईज्जती या घटनेतून झाली. प्रत्येक पोलिस ठाण्यात गुडमॉर्निंंग पथक असते! हे पथक भल्या पहाटे उठून त्यांच्या हद्दीतील संवेदनशिल भागात फेरफटका मारते. सामाजिक शांतात बिघडवणारी काही घटना घडली असेल तर लागलीच ती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम असे पथक करते. वादग्रस्त रांगोळी काढली गेली असताना ती पोलिसांच्या गुडमॉर्निंग पथकाच्या निदर्शनास का आली नाही? आता याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले. त्यात दोषी पोलिसांवर थातूरमातूर कारवाई केली जाईलही! मात्र, आता वेळ निघून गेल्यावर या कारवाईला काहीच अर्थ नाही.
‘ते’ फलक कोणाच्या आशीर्वादाने?
तणाव निर्माण होईल असे वादग्रस्त फलक नगर शहरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच लागले! हे फलक तणाव निर्माण करणारे आहेत आणि ते हटवले पाहिजेत असे पोलिसांना का वाटले नाही? मुळातच नगर शहरातील पोलिस यंत्रणाच ढेपाळलेली आहे. अनुचित प्रकार घडणार आणि त्याचे पडसाद उमटणार हे गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील गल्लीबोळात बोलले जात होते. पोलिसांना त्याचा मागमूस लागू नये याचेच आश्चर्य वाटते. वादग्रस्त फलक काढले जातीलही! मात्र हे फलक कोणी लावले आणि कोणाच्या आदेशाने लावले याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे.
जनतेने शहाणपण टिकविण्याची गरज!
खरे तर मतांसाठी समाजकलुशीत करण्याचे, दोन धर्मामधली दरी वाढवण्याचे प्रयत्न याआधीही अनेकदा झालेत! नेता सुभाष चौकातील बाँम्बे बेकरी काही वर्षापूव झालेल्या जातीय दंगलीत कशी पेटवली याचा इतिहास तपासण्याची गरज आहे. खरे तर दोन समाजात दरी निर्माण करणाऱ्या लाटा आल्या आणि गेल्याही! त्यातून त्या-त्यावेळी समाजात दरी निर्माण झाली असेलही, समाज विस्कटला असेलही पण विखुरलेला नक्कीच नाही. हिंदू आणि मुुस्लिम समाजातील राजकारणापलिकडील काही मंडळींनी पुढाकार घेत हे दोन्ही समाज विखुरणार नाही, गुण्यागोविंदाने एकत्र राहत असल्याचे दाखवून देण्याची गरज आहे. राजकीय पोळी भाजण्यास सज्ज झालेल्या दोन्ही समाजातील नेत्यांनी शहाणपण गमावलं तरी आम्ही हे शहाणपण सोडणार नाही हे दोन्ही समाजातील सामान्य जनतेने कृतीतून दाखवून देण्याची गरज आहे.
फक्त आणि फक्त मतांचे राजकारण!
नगर शहरातील मुकुंदनगर, सर्जेपुरा हा मुुुस्लिम बहुल भाग! शहरातील अन्य हिंदू वस्ती असणाऱ्या भागात मुस्लिम कुुंटंबे आहेतच! त्यांची संख्या कमी असेलही! वर्ष- दीड वर्षापूवपर्यंत नगर शहरात हे दोन्ही समाज गुण्या गोविंदाने नांदत आलेत! दोन्ही समाजात अनेक व्यवहार झाले आणि होताहेत! मात्र, असे असताना या दोन समाजात तेढ निर्माण करण्याची ‘काळजी’ काहींनी घेतली! ती त्यांनी यशस्वी कशी केली हे आता स्पष्टपणे समोर आले आहेच! या साऱ्यात महापालिकेची येणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीत मतांचा गठ्ठा इतकाच काय मतितार्थ!
राजकारण हा माणुसकीला फाट्यावर मारणारा व्यवसाय!
राजकीय नेतेमंडळी सत्तेसाठीच्या साठमारीमुळे कोणत्याही पातळीवर जातात हे लपून राहिलेेले नाही. दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य एकाच बाजूने होतात असे नाही. ती दोन्ही बाजूने होतात. त्यातून दोन्ही बाजूच्या कथीत नेत्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साध्य करायचा असतो. कालच्या घटनेतही तेच झाले. खरे तर भोवताल बेचव होत आहे की केला जात आहे याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे. राजकारण हा तत्व मूल्य सुसंस्कृतता, विधीनिषेध, माणुसकी या साऱ्याला सोडचिठ्ठी देऊन केला जाणारा व्यवसाय झाला असल्याचे स्पष्टपणे समोर आले हेही नक्की!