अहमदनगर | नगर सहयाद्री
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे जाणारी पदयात्रा आज दि २१ व २२ जानेवारीला नगर जिल्ह्यातून जाणार आहे. पोलिस प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे.
नगर पाथर्डी महामार्गावरून यात्रा नगरजवळ बाराबाभळी येथे मुक्कामी येणार आहे. तेथून २२ जानेवारीला नगरमार्गे सुपा, रांजणगावच्या दिशेने यात्रा जाणार आहे. पाथर्डी-नगर व नगर-पुणे महामार्गावरून ही यात्रा जाणार असल्याने पोलिस प्रशासनाने या मार्गावरील बंदोबस्त, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आदींचे नियोजन केले आहे.
नगर शहरातून जीपीओ चौक, मार्केट यार्ड, बसस्थानक चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक, केडगावमार्गे पुणे महामार्गाने यात्रा रवाना होणार आहे. त्यामुळे नगर शहरातही मोठी वाहतूक कोंडी होण्याची शयता आहे. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज !
मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे वादळ आज, जिल्ह्यात धडकणार आहे. या पदयात्रेतील आंदोलकांची सेवा आणि स्वागतासाठी मराठा समाजासह नगरकरही सज्ज आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे सायंकाळी सभा होणार आहे. यासाठी दिडशे एकर जमिनीवर स्वच्छता करण्यात आली असून भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
४ टन पोहे…२ टन पिठले अन् भाकरी!
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जरांगे यांच्यासह येणाऱ्या लाखो सहकाऱ्यांचे सकल मराठा समाजातर्फे स्वागत करण्यात येणार आहे. पदयात्रेत सहभागी चार ते पाच लाख मोर्चेकरी येणार असल्याचा अंदाज गृहीत धरून मराठा बांधवांसाठी ४ टन पोहे आणि जेवणासाठी २ टन पिठले तयार करण्यात येणार आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सुमारे ७५ ते ८० गावांतून चपाती, भाकरी, पिठलं व इतर साहित्य जमा करण्यात येईल, तर भाजी, खिचडी, लापशी, पोहे पाथर्डी तालुक्यातील आगसखांड येथेच बनवण्यात येणार आहे.