अहिल्यानगर । नगर सहयाद्री
करंजी घाटामध्ये वाहन अडवून लुटमार करणाऱ्या आरोपींची स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपी संकेत चिंधु पडवळ, नामदेव बाळासाहेब भोकसे दोघे (रा. कुरकुंडी ता. खेड, जि.पुणे) यांना ताब्यात घेतले. त्याचा साथीदार जगदीश सुरेश शिवेकर (रा.करंजविहिरे ता. खेड जि.पुणे ) अद्याप फरार) आहे.
गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटे एका प्रवाशाची काळ्या रंगाची कार अडवून, त्यांचे सोन्याची साखळी तसेच खिशातील रक्कम असा एकूण ७४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजी बाळासाहेब पाटेकर (वय ३२, ढोरजळगांव, पाथर्डी) यांनी फिर्याद दिली होती.
त्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. पथकाला सदरचा गुन्हा वरील आरोपींनी केला असून ते २८ ऑक्टोबर रोजी कडुस फाटा खेड येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापाला सापळा रचून आरोपी संकेत चिंधु पडवळ आणि नामदेव बाळासाहेब भोकसे यांना ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा साथीदार जगदीश सुरेश शिवेकर याच्यासोबत केला असल्याची कबुली दिली. कारवाईत पथकाने ७ लाख रुपयांची हुंदाई व्हेरना कार आणि १ लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, सुरेश माळी, दिपक घाटकर, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, मनोज साखेर, भगवान धुळे यांनी बजावली आहे.



