अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील अनधिकृत नळ कनेशन शोधण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या निविदा प्रक्रियेची फाईल महापालिकेतून गहाळ झाली आहे.
महापालिकेतून ‘ती’ फाईल गहाळ, नेमकं प्रकरण काय?
आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यासाठी प्रशासकांनी आदेश दिले होते. त्यानुसार प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी मंजुरीही दिली होती. मात्र, त्यानंतर ही फाईल पाणीपुरवठा विभागापर्यंत पोहोचलीच नाही. परिणामी, ही मोहीम राबवण्यासाठी आता जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अनधिकृत नळ कनेक्शन नियमीत करण्याबाबत पाणी पुरवठा विभागाने धोरण निश्चित करून अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी यापूर्वी प्रक्रिया झालेली आहे. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ कनेक्शन असल्याने व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम राबवून खासगी संस्थेमार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन दरही निश्चित झाले.
ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यासाठी प्रस्ताव होऊन त्याला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. शनिवारी आचारसंहिता लागू होणार असल्याने शुक्रवारीच कार्यारंभ आदेश देण्यासाठी प्रशासकांनी सूचना दिल्या होत्या. मात्र, ऐनवेळी ही फाईल महापालिकेतून गायब करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाकडून फाईलचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने ही मोहीम आता जूनपर्यंत बारगळला आहे.