अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेची कारवाई अन्यायकारक असून कायद्यानुसार मोजमाप होईपर्यंत कुठलीही तोडफोड करण्यात येऊ नये मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सावेडीमधील वर्षा कॉलनी, एक्या नगर, मॉडेल कॉलनी, अभियंता कॉलनी, मिस्कीन नगर, जॉगिंग ट्रॅक परिसर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड आणि सवेडी उपनगर या परिसरांतील अनेक नागरिकांच्या घरांवर, भिंतींवर आणि कंपाउंडवर अतिक्रमणाच्या खोट्या चिन्हांकनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर चिन्हांकन करताना महापालिका प्रशासनाने कोणतीही लेखी नोटीस दिली नाही. नागरिकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी मालमत्तेत प्रवेश करून ही कारवाई केली.
आठ दिवसांत बांधकामावर कारवाई केली जाईल असे तोंडी सांगण्यात आले. ही संपूर्ण पद्धत कायद्याच्या विरुद्ध असून,नागरिकांना मानसिक त्रास देणारी आणि त्यांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारी आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन दिले. सर्व चिन्हांकनांची फेरतपासणी कायदेशीर मार्गाने, मोजमाप करून आणि नागरिकांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे करावी.
तसेच कारवाई करण्याआधी संबंधितांना लेखी नोटीस देण्यात यावी. नागरिकांवर अन्याय न करता पारदर्शक पद्धतीने काम करावे असे गाडे यांनी सांगितले.या वेळी प्रशांत आहेर, जोशी विश्वकर, प्रसाद जोशी, सारंग दिवटे, ओंकार पाटील, अनिरुद्ध ठोंबरे, वैभव सांगळे, भागचंद लोखंडे, राज गोरे, करण पुंड, विराज भागवत, सार्थक गाडे, सोमनाथ गाडे, अथर्व पादिर, प्रथमेश महिंद्रकर आदी उपस्थित होते.